आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वस्थ आठवलेंना समन्वयाची काळजी, शिवसेना- भाजपमधील वाद काळजीचे कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रात आणि राज्यात भाजपची सरकारे येऊनही कुठेच वर्णी न लागल्याने अत्यंत अस्वस्थ व हतबल झालेल्या रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आता महायुतीमधील हेवेदाव्यांचे निमित्त पुढे करत समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. रामदास आठवले लोकसभा निवडणुकीत युतीबरोबर होते. त्याचा मोबदला म्हणून त्यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर घेण्यात आले. विधानसभेला त्यांनी शविसेनेची साथ सोडत भाजपशी घरोबा केला. परंतु राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होऊन रिपाइंला हाती मंत्रिपद सोडा साधे विधान परिषदेचे एखादे सदस्यत्वही मिळालेले नाही.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. या रिक्त होणाऱ्या मंत्रिपदावर आपली वर्णी लागेल, अशी आठवले यांना अपेक्षा होती. परंतु तीही पूर्ण होत नाही. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या आठवले यांनी आता शविसेना-भाजपमधील मतभेदांवर बोट ठेवत समन्वय समितीचे पिल्लू सोडून दिले आहे. ते केवळ समितीची मागणी करून थांबलेले नाहीत तर ‘काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे भांडत राहाल तर सत्ता गमावून बसाल’, असा मोलाचा सल्लाही देण्यास विसरलेले नाहीत.

भाजपवर नाराजी
शिवसेनेची साथ सोडून रिपाइंने जेव्हा भाजपशी हातमिळवणी केली, तेव्हा सत्तेत वाटा देण्याचे लेखी वचन देण्यात आले होेते. मात्र, सत्ता येताच भाजपला आपल्या वचनाचा विसर पडल्याचे आठवले यांचे म्हणणे आहे.

इंदू मिलचे काय?
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेले घर संरक्षित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा िनर्णय स्तुत्य आहे. पण, दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवरील बाबासाहेबांच्या स्मारकाचे घोडे पुढे का सरकत नाही, असा सवाल आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.