आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale UPSET On Shiv Sena Over Lok Sabha

केंद्रात मंत्रिपद नाकारल्याने आठवलेंसह ‘रिपाइं’ कार्यकर्ते अस्वस्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सातारा मतदारसंघातील ‘रिपाइं’च्या अत्यंत निराशाजनक कामगिरीवर सातत्याने बोट ठेवत रामदास आठवले यांचा महायुतीकडून अवमान होत असतानाच केंद्रीय मंत्रिपदास भाजपने ठाम नकार दिल्यामुळे रिपाइं कार्यकर्त्यांत मोठी नाराजी पसरली आहे.
मागील लोकसभेला शिर्डी मतदारसंघात रामदास आठवले यांचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर आठवले यांनी ‘यूपीए’ची साथ सोडत महायुतीशी घरोबा केला. लोकसभेला ‘रिपाइं’ने तीन जागांची मागणी केली असताना केवळ सातार्‍याची अन् तीही पराभूत होणारी एकच जागा देण्यात आली. या जागेवर ‘रिपाइं’ने अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयनराजे निवडून येणार हे जगजाहीर होते. मात्र रिपाइंचे गायकवाड तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. शिवसेनेचे बंडखोर पुरुषोत्तम जाधव यांना दुसर्‍या क्रमांकाची तर ‘आप’च्या राजेंद्र चोरगे यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली.
‘नंतर विचार करू’
दरम्यान, मंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या आठवले यांनी शनिवारी (24) दिल्लीत नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मोदी यांनी सातार्‍यात ‘रिपाइं’च्या निराशाजनक कामगिरीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच पहिल्या टप्प्यात ‘रिपाइं’ला मंत्रिपद देणे शक्य नाही. दुसर्‍या टप्प्यात तुमचा नक्की विचार करू, असे आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली. लोकसभा निवडणुकीत दलित मते मोठ्या प्रमाणात ‘एनडीए’कडे गेल्याचे दिसून आले आहे. लोकसभेच्या राज्यातील 47 जागांवर शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला. मात्र, सातार्‍यामध्ये शिवसेना-भाजपची मते ‘रिपाइं’ उमेदवारास मिळाली नाहीत, असा रिपाइं नेत्यांचा आरोप आहे.
विधानसभेपूर्वी मंत्रिपद
‘रिपाइं’चा एकही उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा नसला तरी राज्यात आठवले यांचे निश्चित असे मतदान आहे. त्यामुळे ‘रिपाइं’ची नाराजी परवडणार नाही. दलित मतांच्या बेगमीसाठी विधानसभेच्या तोंडावर आठवले यांना केंद्रीय मंत्रिपद दिले जाईल, अशी शक्यता आहे.
छायाचित्र - रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले व मंत्रिपदाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.