आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवलेंच्या मनात राज्यसभेचे मांडे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रामदास आठवले यांच्या आत्यंतिक आग्रहामुळे अखेर मंगळवारी महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना-रिपाइं नेत्यांमध्ये जागा वाटपाची प्राथमिक फेरी पार पडली. ‘मातोश्री’शेजारील आठवले याच्या संविधान निवासस्थानी झालेल्या या बैठकीत जागावाटप तर झालेच नाही, मात्र आठवले लोकसभेसाठी नव्हे, तर राज्यसभेसाठी उत्सुक असल्याची ‘अंदरकी बात’ पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांना कळून चुकली.

राज्यभर दौरे करताना आठवले यांनी विविध शहरांत ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन ‘महायुतीने जागा वाटपाबाबत चर्चा करावी’ असा लकडा गेले दोन महिने लावला होता. शिवसेनेकडेही तशी मागणी केली जात होती. लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी आहे. मात्र, आठवले यांच्या आत्यंतिक आग्रहामुळे शिवसेनेने मंगळवारी चर्चेची प्राथमिक फेरी उरकली. शिवसेनेचे नेते लीलाधर डाके, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि गजानन कीर्तिकर हे नेते बैठकीला उपस्थित होते. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गैरहजेरी सर्वकाही सांगून गेली. ‘आमची युती शिवसेना-भाजपशी आहे,’ असे आठवले नेहमी सांगत असताना भाजपचा एकही नेता या बैठकीला हजर नव्हता. रिपाइंने लोकसभेच्या पाच जागांसाठी बैठकीत आग्रह धरला. त्यातील किमान तीन तरी द्या, अशी तोडही केली. आठवले यांनी मात्र लोकसभेचा विषय सोडून राज्यसभेचा आग्रह धरला. आठवले दक्षिण मध्य मुंबईसाठी आग्रह धरतील, अशी सर्वांची अटकळ होती. परंतु, आठवले यांचा जीव राज्यसभेत गुंतला असल्याचे स्पष्ट झाले.


दलित प्रश्नही घ्या!
महायुती झाल्यापासून राज्यात मोठी निवडणूक झालेली नाही. आगामी लोकसभा निवडणूक महायुतीचा पहिलाच अनुभव असेल. महायुतीच्या जाहीरनाम्यात दलित प्रश्नही घ्या, एवढी आठवण देण्यास मात्र आठवले या वेळी विसरले नाहीत.