आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज आणि उद्धव भविष्यात एकत्र येतील असे वाटत नाही- रामदास आठवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना-भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी यावे असे जाहीर मत व्यक्त करणारे रिपाई नेते रामदास आठवले यांनी आता याच मुद्यावरून कोलंटउडी मारली आहे. राज आणि उद्धव भविष्यात एकत्र येतील, असे आपल्याला वाटत नाही, अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच या दोघांनी एकत्र यावे, असे आपण म्हटलो नसून, त्याबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, अशी सारवासारव त्यांनी केली. ते आज मुंबईत बोलत होते.

मुंबईत मागील आठवड्यात कुर्ला येथे झालेल्या रिपाईच्या संकल्प मेळाव्यात आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीत यावे असे जाहीर मत मांडले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने मुखपत्र 'सामना' मधून मित्रपक्षाला महायुतीचा धोबीघाट करु नका असा दम वजा सल्ला दिला होता. त्यावर आठवले यांनी टाळीची भाषा तर शिवसेना व भाजपनेच केली होती. आपला मनसेला महायुतीत घेण्यास विरोध होता. मात्र तो आता मावळला असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आज राज आणि उद्धव भविष्यात एकत्र येतील, असे वाटत नाही, अशी घेतलेली/बदललेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

भाजप मनसेला महायुतीत घेण्यासाठी आग्रही होते व आजही आहे. तेव्हा मनसे आल्यास महायुतीतून बाहेर पडू अशी भूमिका आठवलेंनी घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या दौ-यावर असलेल्या आठवलेंनी कुर्ल्याच्या सभेत मनसेने महायुतीत यावे असे म्हटले होते. त्यांच्या या मागणीने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. आता आठवलेंनी पुन्हा कोलंटउडी घेत ठाकरे बंधुंनी एकत्र यावे असे माझे मत नसल्याचे म्हटले आहे. त्याही पुढे जाऊन त्यांनी, ते भविष्यात एकत्र येतील असेही वाटत नसल्याची भविष्यवाणीही करून टाकली आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी मनसेच्या नेत्यांना भेट घेऊ नये, असेही मत व्यक्त केले.