आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Kadam Quit Assembly For Divakar Ravate Does Not Give Chance To Talk

रावतेंनी बोलू न दिल्याने कदमांचा सभात्याग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचे गटनेते सभागृहात बराच वेळ बोलतात त्यामुळे आम्हाला बोलायला मिळत नाही, ते सभापतींच्या दालनात कामकाजाबाबत चर्चा करतात; परंतु आम्हाला सांगत नाहीत, बोलायला मिळत नसेल तर उद्यापासून तोंडावर पट्टी बांधून येतो या शब्दांत रामदास कदम यांनी शिवसेना गटनेते दिवाकर रावते यांच्यावर आरोप करीत सभात्याग केल्याने शिवसेना नेत्यांत आलबेल नसल्याचेच चित्र दिसून आले.

प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विधान परिषदेत सहकार कायदा सोमवारी रात्री उशिरा मंजूर झाल्याचे सांगून शेकापचे जयंत पाटील यांनी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे विषय उपस्थित केला. सहकार कायद्यावर आम्हाला बोलावयाचे होते. काही सदस्य बराच वेळ बोलतात; परंतु आम्हाला वेळ मिळत नाही. शेवटच्या आठवड्यात सगळी विधेयके घेण्याऐवजी प्रत्येक आठवड्याला एक विधेयक घ्यावे व सर्व सदस्यांना बोलू द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर रामदास कदम म्हणाले, सहकार कायदा सुधारणा विधेयकावर दिवाकर रावते पाच-सहा तास बोलले, त्यामुळे आम्हाला बोलता आले नाही. सोमवारी हे विधेयक मंजूर होईल असे वाटले नव्हते. मंगळवारी सकाळी विधेयक मंजूर झाल्याचे समजले. गटनेते आम्हाला काही माहिती देत नाहीत, अशी तक्रारही रामदास कदम यांनी केली. तसेच सभापतींनी एखादा सदस्य जास्त वेळ बोलत असेल तर त्याला बसवायला पाहिजे, असेही कदम म्हणाले.

सभापतींच्या दालनातील विषय बाहेर येत नाहीत
जलसंधारणावर खास चर्चेत रावते यांनी ते स्वत: व पांडुरंग फुंडकर बोलतील, असे सांगितले तेव्हा कदम संतापून म्हणाले, गटनेत्यांनी कोण कोण बोलणार याची माहिती घेतली पाहिजे, त्यांची नावे दिली पाहिजेत, असे सांगून सभात्याग केला. यानंतर स्पष्टीकरण देताना रावते म्हणाले की, सभापतींच्या दालनात फक्त चर्चेला किती वेळ द्यावा यावर चर्चा होते, कोण बोलणार यावर नाही. मात्र, कदम यांचे समाधान झाले नाही.संध्याकाळी मुंबईतील समस्यांवर चर्चा सुरू झाली तेव्हा रावते यांनी या चर्चेत कदम बोलतील, असे सांगून त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला.