आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैतापूरला आमचा नव्हे, शेतकर्‍यांचा विरोध; रामदास कदम यांचे घूमजाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जैतापूर प्रकल्प कोकणच्या माणसाला नष्ट करणारा असल्याने तो होऊ नये, अशी शिवसेनेची नव्हे, तर तेथील शेतकर्‍यांची इच्छा आहे. शिवसेनेने फक्त या शेतकर्‍यांना पाठिंबा दिला आहे,’ अशी भूमिका शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

जैतापूर प्रकल्प होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह पुन्हा पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. शिवसेनेच्या या घूमजाव भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

जैतापूर प्रकल्प होऊ नये म्हणून शिवसेना सुरुवातीपासूनच आक्रमक आहे. केंद्रातील व राज्यातील सत्तेत भाजपसाेबत सहभागी हाेऊनही शिवसेनेने भूमिकेत कधीही बदल केलेला नव्हता. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प करणारच, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या मुद्द्यावरून दाेन्ही पक्षात वादही निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनीही प्रकल्पाला विराेध कायम ठेवला. त्यांच्या सूचनेनुसारच शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेटही घेतली होती, परंतु त्यांनी प्रकल्प रद्द करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने भाजपविराेधात संघर्षाची भूमिकाही घेतली. या पार्श्वभूमीवर कदम यांचे वक्तव्य चकित करणारे आहे.

प्रकल्पामुळे धोका
शिवसेना खासदारांशी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी, ‘आपण अणुतंत्रज्ञानातील तज्ज्ञ नसून या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करतो’, असे सांगितले होते. त्यानुसार १७ संस्थांनी या प्रकल्पाविरोधात तयार केलेल्या अहवालाची आम्ही एक फाइल तयार केली आहे. या प्रकल्पातून समुद्रात सोडण्यात येणार्‍या प्रकल्पाच्या गरम पाण्यामुळे मासेमारी नष्ट होणार असून नागरिकांच्या जिवालाही धोका आहे, असे अनेक अहवालांत नमूद करण्यात आले आहे. ही फाइल आम्ही पंतप्रधानांना अभ्यास करण्यासाठी देणार आहोत. ही फाइल वाचल्यानंतर पंतप्रधान स्वतःच प्रकल्प रद्द करतील. - रामदास कदम, पर्यावरणमंत्री