आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्र्यांचा शिवसेना व राष्ट्रवादीला वेगवेगळा न्याय- रामदास कदमांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांना वेगळा न्याय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करीत सेनेचे नेते रामदास कदम यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील व राष्ट्रवादीच्या राजकारणावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात ज्या मुलींनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्यांच्यावर कारवाई होत नाही मग भुजबळ, मलिक, आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर आला की कशी काय कारवाई लागलीच होते, याचा जाब विचारला.
मागील आठवड्यात सेनेचे शिक्षक आमदार हिरे यांचे बंधू अद्वेय हिरे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून छगन भुजबळांविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. त्याप्रकरणी हिरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून सशस्त्र हल्ला केला होता. यात किरकोळ मारहाणीसोबत मोडतोड करण्यात आली होती. त्यानंतर हिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक करून जेलमध्ये रवानगी केली होती. हाच मुद्दा घेत सेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.
कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह देशाला धक्का बसला. मात्र कुठल्या तरी मुलीने बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. त्यावेळी भुजबळ, मलिक यांच्यासारखी तत्काळ कारवाई का झाली नाही. बाळासाहेबांवर प्रेम करणा-या लोकांचा संयम संपल्यावर व वाद झाल्यावर त्या मुलीवर गुन्हा दाखल केला. त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारल्या. मग आता छगन भुजबळ, त्याआधी मलिक यांच्याविषयीही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला की लगेच कारवाई कशी होते. आव्हाड यांच्याबाबतही अशीच घटना घडली की गुन्हा दाखल व चौकशी करून ताब्यात घेणे या घटना कशा काय होतात, याचे उत्तर आर आर पाटील यांनी द्यावे. गृहमंत्र्यांनी स्वत:च्या पक्षासाठी व इतरांसाठी वेगवेगळा कायदा तयार केला आहे काय असा सवाल कदम यांनी केला आहे.