मुंबई - तक्रारखोरांचा एक गट महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये आहे. त्यांची कटकट नको म्हणून अशाच तक्रारखोरांना महत्त्वाची पदे दिली जातात. मात्र, अशा लोकांमुळे प्रामाणिक व कष्टाळू कार्यकर्ते बाजूला सारले जातात. अशा तक्रारखोरांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चाप लावण्याची गरज आहे, अशी मागणी माजी मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना एक पत्र लिहून केली आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावे लागलेले राणे पक्षाच्या कार्यक्रमापासून दूरच आहेत. त्यांनी आता
आपले मौन सोडले आहे. ‘एखाद्या व्यक्तीविरोधात आलेल्या तक्रारींची नेतृत्वाने शहानिशा करायला हवी. त्यानंतर पाऊल उचलणे योग्य ठरेल. अन्यथा पक्षावर मोठा परिणाम होऊ शकतो. आधी झालेल्या चुका टाळायला हव्यात,’ असे राणेंनी पत्रात म्हटले आहे. काँग्रेसला पुन्हा जिवंत व्हायचे असेल तर आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करा, असे आर्जवही राणेंनी केले आहे.
‘जनाधार असलेल्या नेत्यांनाच पक्षात स्थान द्यायला हवे. त्याचबरोबर एखादी नियुक्त व्यक्ती जनतेच्या अपेक्षांना उतरत नसेल तर त्यांना तत्काळ बदलायला हवे. स्वार्थी नेते व कार्यकर्त्यांना पदे देऊ नयेत. राज्य पातळीवरील निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांना कोटा देण्याची पद्धत बंद करावी. त्याचबरोबर पक्षाध्यक्ष, उपाध्यक्ष व सरचिटणीसांनी नियमितपणे सर्व राज्यांचे दौरे करणे गरजेचे आहे,’ असे मत राणेंनी व्यक्त केले आहे.