आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर मिलिंद कदम गृहराज्यमंत्र्यांचेच \'पीए\', काँग्रेसने जमवले आणखी पुरावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासमोरील राजकीय अडचणी वाढतच चालल्या असून विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढवला अाहे. एप्रिल महिन्यात लाच घेताना पकडण्यात आलेले मिलिंद कदम हे आपले स्वीय सहायक वा वैयक्तिक सहायक नव्हते, असा दावा करणारे पाटील हे खोटारडे असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून कदम हे पाटील यांचे स्वीय सहायक हे सिद्ध करणारे कागदपत्रच काँग्रेसने प्रसिद्ध केले.

‘एक एप्रिल रोजी कदम यांना लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर पाटील यांनी एक खुलासा प्रसिद्धीस दिला होता. त्यानुसार कदम हे आपल्याकडे स्वीय सहायक, खासगी सचिव तथा विशेष कार्यकारी अधिकारी किंवा आपले वैयक्तिक सहायक नाहीत. ज्या वेळेस विधि व न्याय विभागाचे कामकाज करायचे असेल तेव्हा ते ब्रिफिंग करण्यासाठी आपल्याकडे येत असतात’, असे पाटील यांनी म्हटले होते. मात्र विधि व न्याय विभागाच्या २९ जानेवारी २०१५च्या आदेशानुसार मिलिंद कदम सहायक (विधि) यांची सेवा राज्यमंत्री पाटील यांच्या आस्थापनेवर ३० जानेवारीलाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या त्यांच्या कार्यालयातील कामकाज वाटप आदेशातही कदम यांचे नाव आहे. यावरून पाटील यांनी जनतेची दिशाभूल करणारी खोटी माहिती दिली असून ते खोटारडे असल्याचे स्पष्ट होते,’ असा आरोप या प्रकरणाचा गौप्यस्फोट करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

कदमांच्या सापळ्यासाठी इतकी तत्परता का?
राज्यात नवे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी नोटरी नियुक्तीत घोळ केला. जानेवारी महिन्यात या पदासाठी मुलाखती झाल्या. आजवरच्या पद्धतीने अशा नियुक्तीचे आदेश दोन दिवसात निघायचे. मात्र ही फाईल जवळपास दोन महिने विधि विभागात, एक महिना राज्यमंत्री पाटील यांच्याकडे तर जवळपास दोन महिने मुख्यमंत्र्यांकडे का पडून होती? यात नेमके काय शिजले? नोटरी प्रकरणी भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: तक्रारदाराला ५० हजार रूपये काढून दिले. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापळा रचण्यास सांगितल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य तेव्हा प्रसिद्ध झाले होते. भ्रष्टाचार प्रकरणी अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यांना प्राप्त होत असताना याच प्रकरणी त्यांनी इतका रस का दाखवला? याप्रकरणात कदम यांची अटक म्हणजे पालीने स्वत: शेपटी तोडून घेत स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रकार आहे का? असे प्रश्न विचारून काँग्रेसने या प्रकरणी नि:ष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांना पाटलांचा इतका कळवळा का?
इतके अाराेप झाल्यानंतरही व त्याचे पुरावे दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यमंत्री रणजित पाटील यांना का वाचवत आहेत, त्यांना पाटलांचा इतका का कळवळा का?, अशा प्रश्नांचा भडिमार काँग्रेसने केला आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात समावेशापासूनच पाटील हे वादग्रस्त ठरले अाहेत. निवडणूक शपथपत्रात त्यांनी संपत्ती दडविल्याची तक्रार करण्यात अाली हाेती. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रणजीत पाटील यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दीपक कासारांची नियमबाह्य नियुक्ती
रणजित पाटील यांचे खासगी सचिव त्र्यंबक कासार यांचे गेल्या पाच वर्षातील गोपनीय अहवाल त्यांनी सादर केले नसतानाही त्यांची नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली. तसेच कासार यांचे नाव त्र्यंबक असतानाही ते दीपक कासार या नावाने वावरत असून राज्यमंत्री पाटील जसे ‘अण्णासाहेब पवित्रकार’ या नावाने वावरतात तसेच त्यांचे सचिवही दोन नावाने वावरत आहेत. कासार यांचे अहवाल सादर झाले नसतानाही त्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्याने या प्रकरणी फडणवीस यांनीच खुलासा करावा, अशी मागणी सावंत यांनी केली.