मुंबई - ‘इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्यात मराठा समाजाला आरक्षण द्यायला भाजप सरकार तयार असून तशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून या समितीने १२०० पुरावे मिळवले असून येत्या १३ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयात ते मांडण्यात येतील,’ असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकारांशी बाेलताना दिले.
दानवे म्हणाले, ‘यापूर्वी काँग्रेसने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण अध्यादेश काढला आणि त्यामुळेच तो न्यायालयात िटकू शकला नाही. आता मात्र असे होणार नाही. तावडे समितीने राज्यभर िफरून याविषयीचे पुरावे तसेच माहिती गोळा केली आहे. तसेच राणे समितीच्या अहवालातील त्रुटीही दूर करण्यात आल्या असून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यापूर्वी ते तज्ज्ञांना दाखवण्यात येईल आणि त्यात आणखी काही सुधारणा करण्याची गरज असल्यास त्या केल्या जातील,’ असे दानवे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेबाबत सावध भूमिका
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई मनपात शिवसेेनेशी युती होणार नसल्याचे सांगितले हाेते. त्यावर पत्रकारांनी विचारले असता थेट उत्तर देण्याचे दानवेंनी टाळले. पत्रकार वारंवार विचारत असताना ‘दुसरा प्रश्न विचारा’, असे दानवे सांगत हाेते.