नागपूर - अंबाजोगाईत अल्पवयीन अपंग मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गरज वाटल्यास हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.
24 जुलै रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका अल्पवयीन अपंग मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्याबाबत आमदार बच्चू कडू यांनी प्रश्न विचारला होता. या प्रकरणाच्या चौकशीला विलंब का होत आहे, अशी विचारणा त्यांनी केली. भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी अशा प्रकरणात आरोपींना पाठीशी घातले जात असून अशा अधिका-यांवर कारवाई होत नाही, असे सांगितले. मनसेचे प्रवीण दरेकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला मदत देणार का, असा प्रश्न उपस्थित केला. उत्तरादाखल बोलताना गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, अंबाजोगाई पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. गुन्ह्याच्या तपासात मुलगी शारीरिक व मानसिक विकलांग असल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात आणखी एका कलमाची वाढ करण्यात आली. आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने व पुरावे उपलब्ध झाल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.
पाटील म्हणाले, या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत देईल. तसेच मुलीला न्याय लवकर मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल. अशा प्रकारच्या प्रकरणाचा तपास जलद व योग्य होण्यासाठी उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याकडे तपास दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. अंबाजोगाई प्रकरणात दिरंगाई झाली नसल्याचे सांगत त्यांनी सरकार दोषी कर्मचारी, अधिका-यांवर कारवाई करेलच, पण चांगले काम करणा-यांचे कौतुकही करेल, असे आश्वासन दिले.