(छायाचित्र- लक्ष्मणराव ढोबळे)
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी पाणी पुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात मुंबईतील बोरिवली पोलिस ठाण्यात शुक्रवारी बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोबळे यांच्या शैक्षणिक संस्थेत काम करणा-या एका महिलेने ही तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ढोबळे यांच्याविरोधात कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रवादीचे नेते असलेल्या लक्ष्मणराव ढोबळे यांचे मुंबईतील गोराई भागात नालंदा नावाचे महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयात संबंधित महिला व्यवस्थापक म्हणून काम पाहते. या महिलेवर ढोबळेंच्या शैक्षणिक संस्थेत 80 लाख रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ही घटना दोन महिन्यापूर्वीची आहे. याबाबत महिलेविरोधात पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. याबाबत चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, संबंधित महिलेने ढोबळे यांनी
आपल्यावर तीनवेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर अश्लील फोटो सार्वजनिक करून बदनामी करेन अशी धमकी देत असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्यावर बलात्काराचे झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित महिलेने माझ्याच शैक्षणिक संस्थेत भ्रष्टाचार केला आहे. त्याची तक्रार केल्याने व त्याची रीतसर चौकशी सुरु झाल्याने संबंधित महिलेने माझ्यावर सुडूबुद्धीने बलात्काराचा आरोप केला आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होताच या महिलेने आरोप केल्याने यामागे मला व माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा राजकीय षडयंत्र आहे. मात्र सत्य समोर येईलच पण त्यासाठी काही काळ जावा लागेल, अशी नाराजीची प्रतिक्रिया ढोबळे यांनी दिली आहे.
पुढे आणखी वाचा, ढोबळेंविषयी...