आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्यात गेल्या वर्षभरात बलात्काराच्या 1704 घटना घडल्या असल्या तरी हे प्रमाण अल्प असल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केला. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याबाबतच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी छापील उत्तरात हा दावा केला.
आमदार अनिल कदम, धनराज महाले, मीरा रेंगे पाटील, प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक आमदारांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला दिलेल्या छापील उत्तरात पाटील यांनी सांगितले आहे की, गेल्या वर्षभर राज्यात 1704 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यापैकी अल्पवयीन मुलींवर 924 बलात्कार झाले आहेत. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर 127 आणि 10 ते 14 वयोगटातील 188 मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, असे असले तरी बलात्काराच्या संख्येतील ही वाढ अल्प असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सन 2005 ते 2011 या कालावधीत राज्यात बलात्काराच्या 10837 घटना घडल्याची माहितीही त्यांनी या उत्तरात दिली आहे. राज्यातील विविध न्यायालयात बलात्काराची 14,414 विनयभंगाची 31,412 आणि छेडछाडीची 9480 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
शंभर जलद न्यायालये- महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी 13 विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली असून 100 जलदगती न्यायालये पुढील पाच वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या 100 न्यायालयांपैकी 25 न्यायालये केवळ महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी असतील, असेही पाटील म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.