आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावपूर्ण वातावरणात आज रत्नागिरीत मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कॉँग्रेस-राष्ट्रवादीत भडकलेल्या वादामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गुरुवारी तणावपूर्ण वातावरणात मतदान होत आहे. उद्योगमंत्री नारायण राणे व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी बुधवारीही एकमेकांवर जोरदार टीकेचा सूर कायम ठेवला. राणेंनी आपल्या मुलासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून प्रचारासाठी राज्यात न फिरता त्यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्गातच तळ ठोकला आहे.

दरम्यान, मतदानाच्या वेळी राडा होऊ नये म्हणून दोन्ही जिल्ह्यांत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 125 पोलिस अधिकार्‍यांसह 1530 पोलिस कर्मचारी, 450 होमगार्ड व राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या तैनात केल्या आहेत. दरम्यान, केसरकर यांनी बुधवारी पत्रक काढून ‘नीलेश राणेंना पाडा, शिवसेनेच्या विनायक राऊतांना विजयी करा,’ असे आवाहन केले आहे.

राणेंनी फक्त विरोधकांवर राग काढला नाही, तर प्रसार माध्यमांनाही धमकी दिली. माझ्या विरोधात बातम्या चालवणार्‍यांना 17 मेनंतर म्हणजे निकालानंतर मी बघून घेईन. माझ्याविरोधात ठरवून प्रचार करण्यात आला. निकालानंतर या जिल्ह्यात मीच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे, अशी धमकीही राणेंनी दिली. दरम्यान, राणेंनी मतदारांना पैसे वाटल्याचाही विरोधकांचा आरोप आहे.

केसरकर शेंबडे, त्यांचे वडील स्मगलर : राणे
आमदार केसरकर यांची माझ्याशी बरोबरी करण्याची लायकी तरी आहे का, ते शेंबडे असून आपल्यासमोर उभे राहायलाही ते घाबरतात. त्यांचे वडील स्मगलर होते. मुख्य म्हणजे केसरकर यांचे वैयक्तिक चारित्र्यही फारसे चांगले नाही. दोन लग्ने त्यांनी केली आहेत. बंडखोरी करून माझ्या मुलाचा विजय ते रोखू शकत नाहीत, अशा खालच्या पातळीवर जाऊन राणेंनी पत्रकार परिषदेत टीका केली.

राणेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी : केसरकर
केसरकर यांनी लगेचच माध्यमांशी संवाद साधत राणेंना प्रत्युत्तर दिले. ‘माझी लायकी काढण्यापेक्षा राणेंनी आधी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून बघावी. चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये त्याची नोंद मिळेल. चेंबूरच्या हर्‍या नार्‍या गँगमधील नार्‍या म्हणजे नारायण राणे होय. आता मतपेटीतून कोकणातील जनता राणेंना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असे केसरकर म्हणाले.