आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP संघटनमंत्री रवींद्र भुसारींच्या राजीनाम्याचे हे आहे कारण, CM चा एककल्ली कारभारही जबाबदार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ करण्याला त्यांचा सुरुवातीपासून विरोध असल्याने त्यांनी  मुख्यमंत्री, नेते व आमदारांच्या  नाराजीची पर्वा कधीच केली नाही. - Divya Marathi
‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ करण्याला त्यांचा सुरुवातीपासून विरोध असल्याने त्यांनी मुख्यमंत्री, नेते व आमदारांच्या नाराजीची पर्वा कधीच केली नाही.
मुंबई  - भाजपचे प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांचा राजीनामा सरकार तसेच पक्षवर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. भुसारींनी वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्याचे  कारण देण्यात आले असले तरी राजकीय दबाव वाढत असल्याने हा ताण सहन न होऊन त्यांनी संघटनमंत्रिपदावर पाणी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.    
 
सरकार व पक्ष यांच्यातील समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या भुसारींना फडणवीस सरकारचा चेहरा भव्य-दिव्य करण्याचा आभास निर्माण करण्याची कसरत जमत नव्हती. पण, त्याऐवजी  वयाची साठी पूर्ण झाल्याचे कारण  अमित शहा यांना देत आपणास जबाबदारीतून  मुक्त करा, अशी विनंती त्यांनी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या भुसारींनी नागपूर कार्यालयीन  मंत्री म्हणूनही काम केले असल्याने  संघटनेतील त्यांचे योगदान अमूल्य होते. संघाकडून अशाच  व्यक्तीची  साधारणपणे प्रदेश संघटनमंत्रिपदी नियुक्ती केली जाते अाणि संघाच्या आदेशाशिवाय  या व्यक्तीला  कोणीही हात लावू शकत नाही. मुख्यमंत्री, नेते व आमदार अशा व्यक्तीवर नाराज असले तरी या नाराजीचा काहीही फरक संघटनेला पडत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.    सन २०११ मध्ये प्रदेश संघटनमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतलेले भुसारी हे अत्यंत शांत स्वभावाचे असून  एखाद्या  गोष्टीला नको तेवढे महत्त्व देऊन त्याचा गाजावाजा करण्यात त्यांना कधीच रस नव्हता. सरकारपेक्षा अाधी संघटना महत्त्वाची, हे सूत्र त्यांनी सुरुवातीपासून पाळले. आपले सारे आयुष्य संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या भुसारींवर गेल्या काही महिन्यांपासून सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचा  ठपका ठेवण्यात येत होता. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ करण्याला त्यांचा सुरुवातीपासून विरोध असल्याने त्यांनी  मुख्यमंत्री, नेते व आमदारांच्या  नाराजीची पर्वा कधीच केली नाही. मात्र, दिवसेंदिवस राजकीय दबाव वाढत असल्याने ते निराश झाले होते.    
 
गेल्या महिन्यात  सरकार व पक्ष संघटनेची माहिती घेण्यासाठी अमित शहा मुंबईत आले होते. या वेळी सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्यात पक्ष संघटना कमी पडत असल्याचे मत मुख्यमंत्र्यांसह नेते व आमदारांनी केली होती. या सर्वांचा भुसारींसह प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे यांच्यावरही रोष होता. मात्र, भुसारींना पदावरून दूर करण्याचा हक्क शहा यांना नसल्याने त्यांनी नेत्यांचे मत फक्त एेकून घेतले. याच वेळी आपल्याला संघटनमंत्रिपदी कामात स्वारस्य नसल्याचे भुसारींनी स्पष्ट केले हाेते.
 
सीएमचा एककल्ली कारभार   
मुख्यमंत्र्यांच्या गेल्या तीन वर्षांतील कारभार पाहता ते एककल्ली कारभार करत असल्याचा संदेश पक्षश्रेष्ठींपर्यंत गेला असल्याचे कळते. कर्जमाफीचा निर्णय अाधी घेतला नाही अाणि नंतर घेतला तरी त्या वेळी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना विश्वासात तर घेतले नाहीच. पण, पक्ष संघटनेलाही विचारात घेतले नव्हते. सर्व फोकस फक्त स्वत:वर ठेवण्याच्या फडणवीस यांच्या कार्यशैलीवर त्यांचे सहकारी व पक्ष संघटनाही नाराज असल्याचे कळते.
 
दानवेंवरही नाराज?   
सरकारचे काम पक्ष संघटनेमार्फत लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे मत मुख्यमंत्री व इतर नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केले होते. या वेळी भुसारींप्रमाणे दानवेंच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त केली होती. दानवे हे पक्ष संघटनेच्या  कामात लक्ष देण्यापेक्षा अधिक वेळ वाद ओढवून घेतात. शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा हाेती.  मात्र, दानवेंवर कारवाई केल्यास मराठा समाजात त्याचा चुकीचा संदेश जाईल, याची भीती वाटल्याने तेव्हा अमित शहांनी कारवाई करणे टाळले हाेते, असेही सांगितले जाते.  
 
संघटनमंत्रिपदाची धुरा तूर्त व्ही. सतीश यांच्याकडे   
भुसारींनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या प्रदेश संघटनमंत्रिपदाची तात्पुरती जबाबदारी व्ही. सतीश यांच्याकडे साेपवण्यात आली आहे. राष्ट्रीय सह संघटनमंत्री असलेले सतीश हे मराठी असल्याने त्यांना महाराष्ट्रातील घडामोडींची चांगली जाण आहे. संघाकडून या पदावर लवकरच पूर्ण वेळ संघटक देण्यात येणार असला तरी हे नाव संघाच्या कार्यशैलीप्रमाणे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.  
बातम्या आणखी आहेत...