आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोकणात संमिश्र कौल : रायगडात राष्ट्रवादी, रत्नागिरीत शिवसेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोकणातील मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापने बाजी मारली असून या आघाडीने शिवसेनेची लढत मोडून काढण्यात यश मिळवले आहे. रत्नागिरीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचाच भगवा फडकला. तर, सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध सारे अशा लढाईत ६४ पैकी ३० नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले असले तरी तीन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष मात्र शिवसेना-भाजपचे निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीतील तटकरे काका-पुतण्याच्या लढाईमुळे रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेत गेलेले तटकरेंचे पुतणे संदीप हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. या ठिकाणी १७ पैकी १३ जागा पटकावून राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीने १३ जागांसह वर्चस्व मिळवले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नरेंद्र भुसाणे यांनी बाजी मारली.

राष्ट्रवादीला शेकापची साथ
माथेरान नगर पंचायतीत शिवसेनेने १४ जागा मिळवत सरशी केली. राष्ट्रवादीला २ जागांवर समाधान मानावे लागले. उरणमध्ये भाजपने १५, शिवसेनेने ४ जागा मिळवल्या असून भाजपच्या सायली म्हात्रे यांना नगराध्यक्षपदाचा मान मिळाला. अलिबागमध्ये शेकापचे सर्व १७ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला खातेही उघडता आलेले नाही. शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे प्रशांत नाईक हे नगराध्यक्ष ठरले. मुरूड नगरपालिकेत शिवसेनेने ९ जागी विजय मिळवला असून राष्ट्रवादीला ३ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या स्नेहा पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. महाडमध्ये शिवसेनेने भाजपबरोबर युती करूनही त्यांना फक्त ५ जागा मिळाल्या. याउलट काँग्रेसने १७ पैकी १२ जागा जिंकून नगराध्यक्षपदही मिळवले. रायगडात शेकापशी आघाडी करण्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला.

राणेंच्या किल्ल्यात युतीची सरशी
सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना- भाजपशी जाेरदार लढत दिली खरी; पण सावंतवाडी, वेंगुर्ले तसेच मालवणमध्ये नगराध्यक्ष मात्र भाजप-शिवसेनेचे निवडून आले. सिंधुदुर्गात पालकमंत्री दीपक केसरकरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजपबरोबर युतीचे गणित काही जमवता न आल्याने त्याचा फटका त्यांना बसला. सावंतवाडीत १७ पैकी काँग्रेसने ८, तर शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून आले. भाजप व अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. येथे शिवसेेनेचे बबन साळगावकर नगराध्यक्ष झाले. वेंगुर्ल्यात काँग्रेसने ७, तर भाजप ६ व शिवसेनेवर १ जागेवर विजय मिळवला.
येथे भाजपचे राजन गिरप नगराध्यक्षपदी निवडून आले. मालवणात शिवसेना व भाजपने प्रत्येकी ५ जागा मिळवल्या, तर काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे महेश कांदळकर हे नगराध्यक्ष झाले. देवगड नगर पंचायतीत काँग्रेसने १० जागा मिळवून सत्ता काबीज केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जोरदार प्रयत्न करूनही त्यांना फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेनेने गड राखला
रत्नागिरीत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली असून त्यांचे १७ नगरसेवक निवडून आले. भाजपला ६ जागी यश मिळाले, तर राष्ट्रवादीने पाच ठिकाणी खाते उघडले. शिवसेनेचे राहुल पंडित हे नगराध्यक्षपदी निवडून आले. या जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. राजापूर नगर परिषदेत शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी आठ नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपद मात्र काँग्रेसच्या हनीफ काझी यांनी पटकावले.

भास्कर जाधवांच्या नाराजीचा फटका
दापोली नगर पंचायतीत शिवसेना ७ ठिकाणी सरस ठरली असून काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी चार जागा मिळाल्या. भाजपने २ ठिकाणी खाते उघडले. खेडमध्ये शिवसेनेचा आवाज घुमला, पण नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे वैभव खेडेकर विजयी ठरले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी खेडवर लक्ष केंद्रित केले होते. चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांची घोषित बंडखोरी राष्ट्रवादीच्या मुळाशी आली असून १० जागा पटकावत शिवसेना मोठा पक्ष ठरला. नगराध्यक्षपद भाजपकडे गेले.
बातम्या आणखी आहेत...