आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रझा अकादमीवर जबाबदारी निश्चित करा; पुरोगामी मुस्लिम संघटनांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या आठवड्यामध्ये आझाद मैदानात झालेल्या हिंसक घटनेसाठी रझा अकादमी व इतर आयोजकांना जबाबदार मानून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शुक्रवारी 'मुस्लिम इन सॉलिडेरिटी फॉर जस्टिस' या संघटनेने केली. सुधारणावादी नेते असगर अली इंजिनिअर, वरिष्ठ पत्रकार जावेद आनंद, सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद आणि आवाझ-ए-निस्वाच्या सदस्या हसीना खान या वेळी उपस्थित होत्या.
इंजिनिअर यांनी या घटनेची तीव्र शब्दांत निंदा करत हा वाद मुळात हिंदू विरुद्ध मुस्लिम नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, जगभरामध्ये मुस्लिम समाजाला मारण्याचा कट असल्याचे गेले काही दिवस पसरवले जात आहे. मशिदींमधून, नमाजच्या वेळी सतत मुस्लिम नेत्यांकडून लोकांना याबाबत सतत माहिती दिली जात होती. त्यामुळे एक प्रकारे भावनिक वातावरण त्यातून तयार झाले, असे ते म्हणाले. जावेद यांनी सांगितले की, पोलिसांनी या वेळी खूप सहनशक्ती दाखवली आणि स्वत: जखमी झाले. त्याचे उत्तर सर्व मुस्लिम मौलवी आणि नेत्यांनी द्यायला हवे. खरे तर महिनाभर अगोदरच त्यासाठी एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून याबाबत माहिती द्यायला सुरुवात झाली होती. त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसतात.
रझा अकादमीसारख्या संस्था हा मुस्लिमांमध्ये चुकीचा संदेश पसरवत असल्याचा आरोप हसीना यांनी केला. याआधी सलमान रश्दी यांची पुस्तके त्यांनी जाळली, तस्लिमा नसरिन यांना विरोध केला. अशा संस्थांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
शिवसेनाप्रमुखांवर टीका- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आझाद मैदानाच्या घटनेनंतर केलेल्या वक्तव्यावरही असगर अली इंजिनिअर यांनी टीका केली. मुस्लिम युवकांनी आझाद मैदानात केलेले कृत्य जेवढे निषेधार्ह आहे तेवढेच ठाकरे यांचे वक्तव्यही. केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठी लोकांची माथी भडकावण्याचे काम सुरू आहे. 2014 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद सुरू झाल्याचेही ते म्हणाले.