आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- महागाईविरोधात पुकारलेल्या युद्धाला थोडासा विराम देऊन ढासळलेल्या आर्थिक वृद्धीला आकार देतानाच गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यामध्ये अल्प मुदतीच्या व्याजदरात (रेपो रेट) पाव टक्क्याने कपात केली. रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) मात्र कोणताही बदल केलेला नाही. व्याजदर कमी झाल्यामुळे थोडाफार सुस्कारा सोडायला मिळाला असला तरी चालू खात्यातील तूट आणि अन्नधान्याच्या महागाईमुळे येणार्या काळात व्याजदरातून दीर्घ सुस्कारा मिळण्याची संधी फार कमी असल्याचा सावध इशारादेखील दिला आहे. आर्थिक विकासाला पुन्हा एकदा सर्वाधिक वृद्धीच्या शिखरावर घेऊन जाताना गुंतवणुकीला चालना देणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी व्याजदर स्पर्धात्मक राहणे गरजेचे असले तरी ते पुरेसे नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दुव्वुरी सुब्बराव यांनी मध्य तिमाही नाणेनिधी धोरण जाहीर करताना स्पष्ट केले. त्यानुसार मध्यवर्ती बँकेने सलग दुसर्यांदा अल्प मुदतीच्या व्याजदरात पाव टक्क्याने कपात करून तो 7.5 टक्क्यांवर आणला आहे.
मुख्य महागाईचा दर गेल्या 35 महिन्यांत कमी झालेला असला तरी आर्थिक विकासदराची प्रकृती मात्र अतिशय ढासळून ती 5 टक्क्यांच्या गेल्या दशकभरातील नीचांकी पातळीवर आली आहे. ही परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँक व्याजदर पाव टक्क्याने कमी करणार याची बाजाराला मोठय़ा प्रमाणावर अपेक्षा होती.
सलग दोन वेळा व्याजदर पाव टक्क्याने कमी झाल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे; परंतु घसरलेल्या आर्थिक वृद्धीची जोखीम करण्याच्या दृष्टीने नाणेनिधी धोरणाचा मुख्य भर असला तरी यापुढे व्याजदर आणखी सुसह्य करण्याच्या दृष्टीने फारच कमी र्मयादा असल्याकडेदेखील सुब्बराव यांनी लक्ष वेधले आहे.
नजीकच्या काळात सरकारकडून खर्चासाठी आणखी हात सैल होण्याची अपेक्षा असल्यामुळे मध्य तिमाही नाणेनिधी धोरणामध्ये रोख राखीव प्रमाणात कोणताही बदल न करता तो 4 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर 5.5 टक्के, तर महागाई 6.8 टक्क्यांच्या पातळीवर राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. गुंतवणुकीला नवसंजीवनी देण्यासाठी केवळ व्याजदर कपात पुरेशी पडणार नाही, तर त्यासाठी पुरवठा साखळीतील अडथळे दूर करून वित्तीय सर्वसमावेशकतेवर भर देण्याची गरज असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.
चालू खात्यातील तूट चिंताजनक - व्याजदर आणखी सुकर होण्याबाबत सावध भूमिका घेतानाच फुगलेल्या चालू खात्यातील तुटीकडे देखील रिझर्व्ह बँकेने लक्ष वेधले आहे. चालू खात्यातील तूट 5 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर जाण्याची अपेक्षा असून कृषी उत्पादनाला मिळालेली वाढीव किमान साहाय्यभूत किंमत आणि इंधनाच्या किमतीत झालेली फेररचना यामुळे चलनवाढ एका ठरावीक र्शेणीत राहण्याची शक्यता आहे; परंतु पुरवठा साखळीतील अडथळे दूर करणे, प्रकल्प अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रशासनात सुधारणा करणे आणि आर्थिक मजबुतीसाठी कटिबद्ध राहण्याच्या दृष्टीने सरकारला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार असल्याचेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
लाभ ग्राहकांना देण्याचा प्रयत्न- रिझर्व्ह बँकेच्या व्याजदराचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी आशा स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी व्यक्त केली आहे. या प्रमुख कर्जदात्या बँकेने अशी भूमिका घेतल्याने कर्ज स्वस्त होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
ऑटो क्षेत्रासाठी 'स्पीडब्रेकर'- मागणी अभावी 'रिव्हर्स गिअर'मध्ये चालत असलेल्या वाहन उद्योगाचा वेग वाढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात पुन्हा एकदा 'स्पीडब्रेकर'च ठरली आहे. एक टक्का अपेक्षा असताना पाव टक्का कपातीमुळे वाहन उद्योगाने नाराजी व्यक्त केली आहे.
प्रमुख बँकांचे वेट अँड वॉच धोरण- गृह आणि वाहन कर्जाचे दर घटवण्याअगोदर मध्यवर्ती बँकेकडून पुढील संकेत काय मिळतात याची बँकांना प्रतीक्षा आहे. अल्प मुदतीचे व्याजदर पाव टक्क्याने कमी होऊन ते 7.5 टक्क्यांवर आलेले असले तरी आपल्या व्याजाचे दर तातडीने कमी करण्याइतपत ही कपात पुरेशी नाही, असे मत बँकांनी व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्क्याने कपात केलेली असली तरी या महिन्यात बँकांकडून व्याज कमी होण्याची शक्यता फार कमी आहे.
बँकांच्या व्याजदराची जैसे थे स्थिती मार्चअखेरपर्यंत कायम राहील आणि रोकड सुलभतेची स्थिती थोडीफार सुसह्य झाल्यानंतर बँका व्याजदर कमी करतील, असे मत इंडियन ओव्हरसीज बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. नरेंद्र यांनी व्यक्त केले. व्याजदर कमी होणे अपेक्षित होते, असे मत व्यक्त करताना सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष एम. व्ही. टांकसाळे यांनी आधार दरात किती प्रमाणात कपात होईल, असे सांगितले.
व्याजदर कपातीचे उद्योग क्षेत्रातून स्वागत- रिझर्व्ह बँकेने केलेल्या पाव टक्का व्याजदर कपातीचे उद्योग क्षेत्राने स्वागत केले असून यामुळे उद्योग क्षेत्राचा आत्मविश्वास आणखी वाढेल तसेच येणार्या दिवसांमध्ये व्याजदर आणखी कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
व्याजदरात आणखी एकदा कपात करण्याचा रिझर्व्ह बँकेने अगदी वेळेवर निर्णय घेतला असून उद्योग क्षेत्राचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यावश्यक असाच आहे. व्याजदरात आणखी कपात करण्यासाठी फारच कमी र्मयादा असल्या तरी आरबीआय यापुढे याचा पाठपुरावा करेल, अशी अपेक्षा आहे.
फिक्कीच्या अध्यक्ष नैनालाल किडवाई म्हणाल्या, रेपो दरात झालेल्या कपातीनंतर ठेवींचे दर कमी करण्याच्या स्थितीत येतील, त्यानंतरच कर्जदारांना व्याजदर कपातीचा फायदा मिळेल आणि पर्यायाने उद्योगांना. अर्थव्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने आरबीआय आणि सरकार काम करीत असल्याचा भक्कम संदेश या पतधोरणाने दिला आहे, असे मत सीआयआयचे अध्यक्ष अदि गोदरेज, यांनी व्यक्त केले.
गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणखी व्याजदर कपातीचे डोस देणे गरजेचे आहे. व्याजदर अध्र्या टक्क्याने कमी झाल्यास सरकारने अगोदरच हाती घेतलेल्या वित्तीय उपाययोजना आणि सुधारणांमुळे वृद्धीला चालना मिळण्यास मदत होऊ शकेल, अशी उद्योग क्षेत्राची अपेक्षा आहे. असे मत असोचेमचे अध्यक्ष राजकुमार धूत यांनी व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.