आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबार पेरणीचे संकट, कृषी विभाग मदतीसाठी सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पावसाने अाेढ दिल्याने राज्यातील पिके संकटात अाली अाहेत. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांतील पावसाची परिस्थिती, खरीप हंगामात झालेली पेरणी आणि पीक परिस्थितीचा आढावा मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. मराठवाड्यासह काही भागात दुबार पेरणीचे संकट असून त्यासाठी शेतक-यांना बी-बियाणे, खते देण्याचे नियाेजन कृषी विभागाने केले अाहे.

मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांकडून प्रत्येक जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिव म्हणाले की, राज्यात सुमारे ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेल्या पिकाच्या उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. ज्या ठिकाणी पिके उभी आहेत ती पिके माती ओलावा संवर्धन करून वाचवण्यात यावी. याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात यावे. राज्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्यास बियाणे आणि खतांची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही केल्या. दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास शेतक-यांच्या मदतीसाठी कृषी विभागाने खते, बियाणे यांचे नियोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात ५२% पाऊस
मराठवाड्यात आतापर्यंत ५२ टक्के पाऊस झाला असून ७५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वात कमी पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यात झाला. मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ३० तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील अाठही जिल्ह्यांत ८६३ टँकर सुरू आहेत.

टंचाई याेजनांना मुदतवाढ
पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठवाडा, नाशिक, जळगाव, नगर व पुणे विभागातील सोलापूर तसेच वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये टंचाई निवारणार्थ करण्यात येणा-या उपाययोजनांना ही मुदतवाढ दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...