आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्व, बिहारमधील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढा, स्वबळावर १५० जागा लढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतून महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेला आता बिहार विधानसभा निवडणुकीत उतरून पक्षाचे राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचे वेध लागले आहेत. तेथील आगामी निवडणुकीत १५० जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेविषयी पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न : शिवसेनेने नेहमीच परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली. तरी हा पक्ष आता बिहारच्या निवडणुकीत उतरतोय. त्याची कारणे काय?
राऊत : काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भूमिपुत्रांची जी स्थिती होती तीच स्थिती सध्या बिहारमधील भूमिपुत्रांची आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात भूमिपुत्रांना शिवसेनेने न्याय मिळवून दिला तसाच न्याय बिहारमधील भूमिपुत्रांना मिळवून देण्यासाठी शिवसेना निवडणुकीत उतरत आहे. दुसरी गोष्ट अशी की, शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करीत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये शिवसेनेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक यासाठी योग्य सुरुवात ठरेल असे वाटते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे. बिहारमध्येही हिंदुत्ववादी लोक असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीही आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्न : निवडणूक अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना उमेदवार दिसले नाहीत?
राऊत : आम्ही खूप उशिरा निर्णय घेतल्याने तयारीला थोडा वेळ लागला. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेनेच्या अनेक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यांची यादीही आहे. शिवसेना तेथे नोंदणीकृत पक्ष नसल्याने आम्हाला वेगळे निवडणूक चिन्ह मिळेल. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जनतेला समजली नसतील.

प्रश्न : प्रचाराचे स्वरूप काय?
राऊत : हिंदुत्व आणि भूमिपुत्रांचे हक्क या दोन विषयांवर आम्ही प्रचारात जास्त भर देणार आहोत. आदित्य ठाकरे यांच्यापासून शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि युवा सेनेचे बिहारी नेते, कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी जाणार आहेत.

प्रश्न : भाजपला शह देण्यासाठी निवडणुकीत उतरलात का?
राऊत : मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. प्रत्येक पक्षाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची आणि आपला आवाका वाढवण्याची इच्छा असते. शिवसेना पक्ष काही राज्यांमध्ये अधिकृतरीत्या नसला तरी शिवसेनेबद्दल क्षात घेऊनच आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख तयार करू इच्छितो. आणि म्हणूनच बिहारमध्ये निवडणूक लढवत आहोत. पुढे आम्ही उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतही उतरणार आहोत.

‘धनुष्यबाणा’पासून शिवसेना वंचित
बिहारमध्ये शिवसेनेला निवडणुकीआधीच पहिला धक्का बसला आहे. पक्षाच्या उमेदवारांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना राज्यस्तरीय पक्ष असल्याने इतर राज्यात त्यांना हेच चिन्ह मिळू शकत नाही. ‘शिवसेनेचे उमेदवार पहिल्या टप्प्यात १२ जागांवर उमेदवार धनुष्य बाणावरच लढतील. परंतु अन्य ठिकाणी हे चिन्ह मिळण्यास अडचण आली आहे,’ असे संजय राऊत म्हणाले. या राज्यातील प्रचारात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचेही राऊत
यांनी सांगितले.