(गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर थोरला मुलगा उत्पल आणि सून उमा यांच्यासमवेत)
पणजी- पंतप्रधान
नरेंद्र मोदी लवकरच
आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करून विस्तार करणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालय देण्यात येणार असल्याची बातम्या सर्वच माध्यमांनी दिल्या आहेत. असे असले तरी भाजपमधून याला कोणताही दुजोरा मिळाला नाही. मात्र पर्रिकर यांनी बुधवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष
अमित शहा यांची भेट घेतल्याने तसे संकेत मिळाले आहेत. याबाबत सांगितले जात आहे की, पर्रिकर लवकरच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून मोदींच्या टीममध्ये दाखल होतील. पर्रिकर हे गोव्यात राहू इच्छित आहेत. मात्र माझी आवश्यकता वाटत असेल तर मला आणखी दोन महिन्यांची मुदत मिळावी अशी विनंती मोदींकडे केल्याचे कळते. तुम्ही मला दिल्लीतच हवे आहात असे मोदींनी जोर लावून पर्रिकरांना सांगितल्याने आपण गोव्यातील खाण उद्योगाशी संबंधित किचकट प्रश्न मिटवून दिल्लीत तत्काळ दाखल होऊ असे त्यांनी मोदींना सांगितल्याचे कळते. मात्र, मोदींनी रविवारी संरक्षणमंत्रीपदाची शपथ घ्या व त्यानंतर काही काळ गोव्यातील समस्याबाबत लक्ष घातले तरी आपली हरकत नसेल असे सांगितल्याचे कळते. त्यानुसार आता पर्रिकर यांनी नव्या मुख्यमंत्र्यांची चाचपणी सुरु केल्याचे कळते आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर व केंद्रात पर्यटन राज्यमंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांची नावे आघाडीवर आहेत. गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष भूपविलेल्या आर्लेकरांना पर्रिकर पसंती देऊ शकतात. कारण नाईक हे लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. अशा स्थितीत पोटनिवडणूका न लादता पर्रिकर राज्यसभेवर जाणे पसंत करतील असे बोलले जात आहे.
पर्रिकर यांनी जर संरक्षणमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तर यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्यानंतर ते तिसरे मराठी संरक्षणमंत्री ठरतील. पवई आयआयटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले पर्रिकर यांची ओळख एक प्रामाणिक व कार्यक्षम नेता अशी आहे. प्रशासनावर असणारी मजबूत पकड ही त्यांची जमेची बाजू आहे. निर्णय घेण्यास सक्षम, उत्साही व उमदे नेतृत्त्व, संघाची तनामनात असलेली शिस्त आदी बाबींसह पर्रिकरांची स्वच्छ प्रतिमा पंतप्रधान मोदींच्या नजरेत भरली आहे. संरक्षण दलांचे आधुनिकीकरण करण्याबरोबरच शस्त्रास्त्रसंबंधित महत्त्वाचे करार करायचे असल्याने मोदींची पर्रिकरांना पसंती आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भंग होणारी शस्त्रसंधी असो की आंतरराष्ट्रीय सीमेवरीव वाढते तणाव, चीनकडून होणारी घुसखोरी रोखणे असो की जागतिक पातळीवर संरक्षणविषयाचे असलेले महत्त्व पाहता मोदींना पर्रिकरसारखा खमक्या नेता हवा आहे.
साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत पर्रिकर-
गोव्याचे दुस-यांदा मुख्यमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर आपल्या साध्यापणासाठी प्रसिद्ध आहेत. 2000 साली ते सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी दुस-यांदा या पदाची शपथ घेतली. गोव्यातील सर्वोच्च पद हातात असतानाही आपल्या राज्याचा दौरा करताना आपल्या आमदारांसोबत ते खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यातही स्कूटरचा वापर करतात. मुख्यमंत्री म्हणून ते कोणत्याही सरकारी अथवा खासगी कार्यक्रमात जातात तेव्हा ते सामान्य कपडे घालतात. याबाबत पर्रिकर यांच्या जवळच्या व्यक्तीने सत्य घडलेली घटना सांगितली ती अशी की, पर्रिकर एकदा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये चालले होते. मात्र त्याचवेळी त्यांची कार खराब झाली. त्यांनी तत्काळ एक खासगी टॅक्सी बोलावली व साधे कपडे व चप्पल घातलेले मुख्यमंत्री हॉटेलवर पोहचले. जेव्हा ते टॅक्सीतून उतरले व हॉटेलच्या गेटकडे जावू लागले तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकांनी आडवले व सांगितले तुम्ही आता जाऊ शकत नाही. तेव्हा पर्रिकरांनी मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे असे सांगितले त्यावर तो सुरक्षारक्षक जोरजोरदार हसू लागला व म्हणाला, तू मुख्यमंत्री है तो मैं देश का राष्ट्रपती हूं. इतक्यात कार्यक्रमाचे आयोजक तेथे पोहचले व पुढील प्रकरण थांबले.
पुढे आणखी वाचा मनोहर पर्रिकर व त्यांच्या कुटुंबियांबाबत...