आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Readiness Of Election: Two Congress Fighting For Seats

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तयारी निवडणूकीची: लोकसभेच्या जागांसाठी दोन्ही काँग्रेसची रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी जाहीर केल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये मतदारसंघांसाठी खेचाखेची सुरू झाली आहे. हिंगोली, परभणी, कोल्हापूर हे मतदारसंघ कॉँग्रेसला हवे आहेत, तर जालना, यवतमाळ, औरंगाबाद या कॉँग्रेसकडील जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. स्थानिक नेत्यांनी त्यासाठी पक्ष प्रमुखांकडे तगादा लावला असून समन्वय समितीच्या बैठकीमध्ये या जागांवर चर्चा व्हावी, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे.


हिंगोलीची जागा 2009 मध्ये राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी लढवली होती. शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. आता युवक कॉँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्यक्ष व राजीव गांधीचे निकटवर्तीय राजीव सातव यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. तसेच परभणीतून राष्ट्रवादीचे सुरेश वरपूडकर गेल्या निवडणुकीत पडले होते. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे गणेश दुधाळकर निवडून आले होते. हा मतदारसंघही काँग्रेसला हवा आहे. कोल्हापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदाशिवराव मंडलिक निवडून गेले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांना पराभूत केले होते. मंडलिक हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने या जागेसाठीही कॉँग्रेस आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले.


अंतिम निर्णय श्रेष्ठींचाच
कार्यकर्त्यांकडून जागांच्या अदलाबदलीची मागणी होत असली तरी दोन्ही पक्षांचे नेते मात्र याबाबत अधिकृत बोलण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक नेत्यांकडून मागण्या होत असतात. मात्र, पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्याशिवाय काहीही बोलणे योग्य नाही. अशीच प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही दिली. जागांची अदलाबदल करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे आताच काही सांगणे कठीण आहे. पण लवकरच समन्वय समितीची बैठक होईल, असे संकेत सावंत यांनी केले.


संख्या वाढविण्याची शर्यत
आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यंदाही दोन्ही कॉँग्रेस आघाडीनेच जनतेला सामोरे जाणार असून गतवर्षीप्रमाणेच 26- 22 असे जागांचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे जागांच्या अदलाबदलीसाठी दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते कितपत अनुकूल राहतात, याबाबत मात्र साशंकता व्यक्त होत आहे.


अंकुशराव टोपेंसाठी जालन्यात फिल्डिंग
हिंगोली मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार असेल तर यवतमाळची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. येथून काँग्रेसचे हरिसिंग राठोड यांचा मागील निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी पराभव केला होता. तसेच परभणीच्या बदल्यात कॉँग्रेसने जालना मतदारसंघ द्यावा, अशीही मागणी कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे. उच्च् व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना आपले वडील व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अंकुशराव टोपे यांच्यासाठी ही जागा हवी असल्याचे सूत्रांनी सांगितले.


औरंगाबादेत विजयाचा राष्‍ट्रवादीकडून दावा
मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी मध्यंतरी औरंगाबादची जागा पक्षाकडे देण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर सहज निवडून येईल, असा दावाही त्यांनी केला होता. सध्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद मतदारसंघातून खासदार असून त्यांनी गतवेळी काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा पराभव केला होता.