आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांशी चर्चेची मोर्चेकऱ्यांची तयारी, संभाजी ब्रिगेडची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे निघत असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या संयोजकांनी फडणवीस सरकारशी आपल्या मागण्यांबाबत बोलणी करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ही चर्चा दूरचित्रवाणीवर जगजाहीर व्हावी, अशी त्यांची अट आहे, असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.

या माेर्चेकऱ्यांच्या मागण्यांशी सहमती दर्शवत सरकारने चर्चेसाठी पुढे येण्याचे अावाहन केले हाेते. त्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डाॅ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले, ‘राज्यात आजपर्यंत नऊ मराठा क्रांती मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांचा शेवट आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत निघणाऱ्या विराट मोर्चाने होईल. मुंबईतला मोर्चा दीड कोटी मराठ्यांचा असेल. राज्य सरकारने आमच्या मागण्यांची तत्पूर्वी तड लावावी अन्यथा आजपर्यंत संयम ठेवलेल्या मोर्चेकऱ्यांचा मुंबईत उद्रेक होऊ शकतो’, असा इशारा त्यांनी दिला. हे मोर्चे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत, याचा एकच एक प्रायोजक नाही. मोर्चाची कल्पना मराठा सेवा संघाची, मात्र त्यात संपूर्ण समाजबांधव उत्स्फूर्तपणे उतरला आहे, त्यामुळे सहभागींची संख्या वाढत आहे. आमच्या मागण्या जगजाहीर आहे, त्या मान्य आहेत की नाही इतकाच काय तो प्रश्न आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही मोर्चाचे संयोजक जाणीवपूर्वक चर्चेपासून दूर राहिल्याचे भानुसे म्हणाले.

अारक्षणासाठी विशेष अधिवेशन बाेलवा
अॅट्राॅसिटी कायदा रद्द करावा, अशी अामची अजिबातच मागणी नाही. मात्र या कायद्यात काळानुरूप बदल करण्यात यावा, इतकीच अाग्रहाची मागणी आहे. मराठा जातीचा समावेश इतर मागास वर्गात (ओबीसी) करावा, त्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अन्यथा मराठा जातीच्या सर्व आमदारांनी राजीनामा तरी द्यावा, अशी मागणीही माेर्चेकऱ्यांतून हाेत अाहे.
मुलीच संवादक : आजपर्यंतच्या सकल मराठा क्रांती मूक मोर्चाची निवेदने शाळकरी मुलीच देत आल्या आहेत, मुख्यमंत्र्यांशी मोर्चेकऱ्यांशी उद्या चर्चा झालीच तर त्याचे नेतृत्वसुद्घा मुलींकडेच असेल.
बातम्या आणखी आहेत...