आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव जीवनात अभिषेक हाच माझा ‘वीरू’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शोलेमध्ये वीरू (धर्मेंद्र) हा माझा जिवलग मित्र होता. तो कधीही हरू नये असे मला वाटायचे म्हणूनच दोन्ही बाजूला हेड असलेले नाणे मी उडवत असे. वास्तव जीवनात माझा वीरू माझा मुलगा अभिषेकच आहे, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी सांगितले. जय-वीरूची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. मैत्रीवर अनेक चित्रपट आले, परंतु आजही जय-वीरूच्या जोडीची जादू कायम आहे.
१५ ऑगस्ट रोजी शोलेला प्रदर्शित होऊन ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अमिताभ यांनी शोलेबाबत आठवणी सांगितल्या. अमिताभ म्हणाले, सुरुवातीचे काही दिवस शोले प्रेक्षकांना आकर्षित करण्यास अयशस्वी ठरला होता. तेव्हा दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी संध्याकाळी लेखक सलीम -जावेद आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी माझ्या घरी आले आणि काय करावे याचा विचार करू लागलो. माझा दीवार चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यात मी मरताना दाखवले होते. कदाचित दोन्ही चित्रपटांत माझा मृत्यू होत असताना दाखवल्यामुळे कदाचित प्रेक्षक येत नसावेत, असे वाटल्याने ते दृश्य पुन्हा चित्रीत करून मला जिवंत केल्याचे दाखवावे असे ठरले. त्यानुसार पुन्हा रामगड येथे जाऊन चित्रीकरण करण्याचे ठरले. मात्र, निघताना सिप्पी म्हणाले, सोमवारपर्यंत वाट पाहू आणि नंतर निर्णय घेऊ. सोमवारनंतर प्रेक्षकांनी चित्रपटाला जी गर्दी केली ती आजही कायम आहे. आजची नवी पिढीही शोलेला पसंत करते यातच सगळे आले.

भारतातील हा पहिला ७० एमएम िस्टरिओफोनिक साऊंड असलेला चित्रपट आहे. प्रेक्षकांना चित्रपट ७० एमएममध्ये दाखवला जाणार होता, परंतु रिळे कस्टममध्ये अडकली असल्याने अनेक चित्रपटगृहांत ३५ एमएममध्येच चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटाची भव्यता जाणवत नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली असावी. ७० एमएमची रिळे आल्यानंतर चित्रपटाला गर्दी झाली.

सर्वांनाच गब्बर साकारायचा होता
गब्बर सिंगच्या भूमिकेबाबत बच्चन म्हणाले, गब्बरची भूमिका ज्यांनी-ज्यांनी कथा ऐकली त्या सर्वांना हेच पात्र करायचे होते. मीसुद्धा रमेश सिप्पी यांना गब्बरची भूमिका द्यावी, असे म्हटले परंतु त्यांनी धर्मेंद्र, मी, हेमा आणि जया यांच्या भूमिका नक्की झाल्याचे सांगितले. अगोदर डॅनी हा गब्बर सिंग साकारणार होता, परंतु त्याच्या तारखांची समस्या उद्भवल्याने सलीम- जावेद यांनी अमजद खानचे नाव सुचवले आणि एक इतिहास घडला. सुरुवातीला गब्बरचा आवाज भूमिकेला योग्य वाटत नव्हता, परंतु नंतर हाच आवाज प्रचंड लोकप्रिय झाला. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच मी आणि अमजद खान चांगले दोस्त झालो. तो मला शॉर्टी म्हणायचा, असेही अमिताभने सांगितले.