आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Writing In Autobiography Not Possible; Lata Mangeshkar

खरे लिहावे लागते म्हणून आत्मचरित्र लिहिणार नाही; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटले होते की, माझे आत्मचरित्र कपाटात धूळ खात पडण्यापेक्षा मी आत्मचरित्र लिहिणारच नाही. माझ्यासोबतचे अनेक कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याने आत्मचरित्र लिहून कोणालाही दुखवायचा माझा हेतू नाही. त्यामुळे मी आत्मचरित्र लिहिणार नाही, असे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्पष्ट केले.


‘अक्षय गाणे’ हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होत्या. लता मंगेशकर यांची अतिशय जवळची मैत्रीण असलेल्या पद्मा सचदेव यांनी मूळ हिंदीत लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद ‘अक्षय गाणे’ या नावाने जयश्री देसाई यांनी मराठीत केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी रात्री हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हृदयनाथ यांनी लतादीदींचे आत्मचरित्र लिहिण्याची विनंती मैत्रेय प्रकाशनाला केली. मात्र, आत्मचरित्र लिहिण्याचा मनोदय नसल्याचे लतादीदींनी स्पष्ट केले.


लतादीदींवर अनेकांकडून अनेक पुस्तके लिहिण्यात आली. मात्र, अक्षय गाणे हे पुस्तक दीदींच्या जवळ जाणारे आहे, असा निर्वाळा देत हृदयनाथ यांनी पद्मा यांच्या लिखाणाचे आणि ते मराठीत आणल्याबद्दल जयश्री देसाई याचे कौतुक केले. या पुस्तकाच्या मूळ लेखिका पद्मा सचदेव डोगरी भाषेतील कवयित्री आहेत. डोगरी भाषेतील शब्दांचे उच्चार मी इतके चांगले कधीच ऐकले नव्हते, जे लतादीदींच्या तोंडून ऐकले, अशी आठवण सांगत लतादीदींनी डोगरी भाषेतही गाणी रेकॉर्ड केल्याचे त्यांनी सांगितले.


ज्ञानेश्वरी, रामायणाप्रमाणे लतादीदी : गोवारीकर
रामायण, गीता, ज्ञानेश्वरी हे शब्द नुसते ऐकल्यावर मन तृप्त करतात, त्याच पंक्तीत लता मंगेशकर हे दोन शब्द बसतात, असे सांगत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही पुस्तकाचे कौतुक केले. ‘अक्षय गाणे’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे अध्यक्षपद चालून आले. या कार्यक्रमाला उषा मंगेशकर, मैत्रेय प्रकाशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आदी मान्यवर उपस्थित होते. पूर्वार्धात लता मंगेशकर यांच्या निवडक गाण्यांचे सादरीकरण करून या कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली.