आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL: चंद्रकांत पाटील- पवार भेटीने भुवया उंचावल्या; राष्‍ट्रवादीचा भाजपला सूचक इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली. या दाेन नेत्यांमध्ये याच विषयावर अाराेप- प्रत्याराेपांचा कलगीतुरा रंगल्यानंतर अाठवडाभरातच त्यांच्याच भेट झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या अाहेत. विशेष म्हणजे या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री जयंत पाटील हे नेतेही उपस्थित हाेते.  
 
शेतकरी संपाला हवा देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसह विरोधी पक्षांचे नेते करत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. हे नेते कोण आहेत, याची यादीही आमच्याकडे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले हाेते.  त्यातच अांदाेलनामुळे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असला तरी एकूण परिस्थिती पाहता जुलैपूर्वी ती पूर्ण होईल, अशी खिस्ती नाही. अशा वेळी राष्ट्रवादीकडून सरकारला सहकार्याची अपेक्षा आहे. त्यासाठी मार्ग काढण्यासाठी शरद पवारांचे मार्गदर्शन  घेताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही सबुरीची मार्ग पत्करावा, अशी सरकारच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडण्यात अाल्याचे सूत्रांनी सांगितले.  
 
कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सरकार सुरळीत चालावे, अशी भाजपची इच्छा महसूलमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केली. त्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना चौकशीच्या जाळ्यात अडकवण्याच्या बातम्या पसरवून त्यांना अस्वस्थ करू नये, असा संदेशही राष्ट्रवादीकडून  देण्यात आल्याचे कळते. अजित पवार व जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्याच्या अर्थ खात्याची धुरा अनेक वर्षे सांभाळली असल्याने सल्ला घेण्यासाठी त्यांनाही या बैठकीला बाेलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अतिशय महत्त्वाच्या बैठकीला कोण नेते येणार आहेत, हे सहजासहजी सांगितले जात नाही. पण, चंद्रकांतदादा यांनी स्वत:च तसे प्रसार माध्यमांसमोर सांगून भाजप सहमतीचे राजकारण करत असल्याचे दाखवून दिले आहे. याच वेळी सहमतीचे राजकारण करत असाल तरी विरोधकांनी टार्गेट करून त्यांच्या चौकशीच्या जाळ्यात अडकवण्याचेही डाव खेळू नका, असा संदेशही या बैठकीतून गेल्याचे समजते.
 
केंद्र व राज्यात सत्ता नसल्याने राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत प्रमुख नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्यास राष्ट्रवादी संप अाणि अन्य माध्यमातून सरकारला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत राहील, यात शंका नाही. अशा परिस्थितीत सहकार्याची भूमिका दोघांकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...