आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाजीअलीत महिलांना प्रवेशबंदीचा फेरविचार करा - उच्च न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली येथील दर्ग्याच्या आतील भागात असलेल्या कबरीपर्यंत जाण्यास महिलांना घालण्यात आलेल्या बंदीबाबत फेरविचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने दर्ग्याच्या विश्वस्तांना केली आहे. तसेच महिलांच्या प्रवेशासंदर्भात न्यायालयाने आदेश दिल्यास त्याचे पालन कशा प्रकारे केले जाईल, अशी विचारणाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली आहे.

भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संघटनेच्या नूरजहाँ नियाझ आणि झाकिया सोनम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. बी. पी.कुलाबावाला यांच्यासमोर सुनावणी झाली. २०१२ साली हाजीअली ट्रस्टने महिलांना दर्ग्यातील कबरीपर्यंत जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे आमच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचे याचिकेत सांगण्यात अाले अाहे. २०१२ पूर्वी मुस्लिम महिलांना या कबरीला स्पर्श करून प्रार्थना करण्याची मुभा होती. मात्र, मुस्लिम धर्मोपदेशक आणि मुस्लिम समाजातील ज्येष्ठ लाेकांच्या मतानुसार महिलांनी कबरीला स्पर्श करणे म्हणजे पाप असल्याचे सांगितल्याने विश्वस्तांनी ही बंदी घातल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील राजू मोरे यांनी केला.

पूर्वीही प्रार्थनेची मुभा नसल्याचा दावा
दर्ग्याच्या विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सरकारकडे मदत मागितली असता त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपणास न्यायालयाकडे दाद मागावी लागली, असेही याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, महिलांना पूर्वीसुद्धा कबरीला हात लावून प्रार्थना करण्याची मुभा नव्हती, त्यामुळे ही याचिका सुनावणीयोग्य नसल्याचे सांगत ट्रस्टचे वकील शोएब मेनन यांनी याचिका निकाली काढण्याची विनंती केली. त्यावर ट्रस्टने या प्रकरणाचा पुनर्विचार करावा, अशी सूचना देत न्यायालयाने पुढील सुनावणी २१ जुलै रोजी ठेवली आहे.