आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reconstruction Starts Through Siddhart Vihar Hostel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ विहार हॉस्टेलच्या पुनर्बांधणीला सरकारची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दलित चळवळीचा केंद्रबिंदू असलेले सिद्धार्थ विहार हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकार मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासाठी वेगळा निधी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या हॉस्टेलमधील विद्यार्थी हे रिपाइंच्या चळवळीचा प्रमुख आधार राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पुढाकाराने शिवसेनेकडे गेलेल्या रिपाइंतल्या रामदास आठवले गटाला धक्का बसणार असल्याचे बोलले जाते.
वडाळा येथे असलेल्या या सिद्धार्थ विहार हॉस्टेलची गेली काही वर्षे दुरवस्था झाली असून तेथे राहणे मुश्किल झाले आहे. या हॉस्टेलची पुनर्बांधणी व्हावी, अशी मागणी गेले काही दिवस रावसाहेब गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. दलित चळवळीमध्ये या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा मोठा वाटा राहिला असून याच हॉस्टेलमधील रामदास आठवले यांना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात संधी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने हे हॉस्टेल स्थापन केले होते. साधारण 70 च्या दशकामध्ये समाजाला हलवून सोडणारी दलित पँथर चळवळ येथे उभी राहिली. तत्कालीन राजकारणातील अनेक मोठमोठ्या सभा, डावपेचाचे आराखडे या हॉस्टेलमध्ये रचले गेले. डाव्या चवळीतीलही अनेक नेते-कार्यकर्तेही या हॉस्टेलचे विद्यार्थी होते. असा ऐतिहासिक वारसा लाभलेली ही वास्तू आता मात्र अत्यंत दुरवस्थेत असून इमारतीच्या काही भागाची पडझड झाली आहे.
ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था
पाणी गळती, मोडलेले छप्पर अशी अवस्था या हॉस्टेलची झाली असून आहे. एकेकाळी दलित चळवळीचा केंद्रबिंदू असणा-या वास्तूची दुरवस्था पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करतात. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ती टिकवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी विद्यार्थी, दलित कार्यकर्ते यांच्याकडून गेले काही वर्ष होत आहे. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने या कामी पुढाकार घेतला असून या हॉस्टेलला मदत देण्याचे ठरवले आहे.

यातून एक सकारात्मक संदेश दलित चळवळीमध्ये जाऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सारे काही मतांसाठीच
रिपाइंला पाठबळ देणा-या या वास्तूकडे दलित नेत्यांचेही दुर्लक्ष झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेस मदतीचा हात पुढे करणार असेल तर एक सकारात्मक संदेश दलित जनतेत जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी शिवसेनेकडे गेलेल्या रिपाइंच्या गटाला धक्का बसू शकेल, असेही राजकारणातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दलित जनतेला डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने इंदू मिलच्या जागेमध्ये डॉ. आंबेडकरांचे स्मारक व्हावे म्हणून मागणी केली होतीच.