आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या संमतीनेच भेंडीबाजार परिसराचा पुनर्विकास?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसर एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा बालेकिल्ला हाेता. मात्र हा परिसर अाता इतिहासजमा होणार आहे. कारण दाऊदी बोहरा समाजाच्या सैफी बुऱ्हाणी अपलीफ्टमेंट ट्रस्टतर्फे या भागाचा पुनर्विकास होणार आहे. नुकत्याच लिलावाद्वारे खरेदी केल्या गेलेल्या दाऊदच्या तीन मालमत्तांचाही यात समावेश अाहे.  या मालमत्ता खरेदी करणाऱ्यास दाऊदकडून धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा अाहे. मात्र  प्रत्यक्षात त्यात तथ्य नसल्याचे स्थानिक नागरिकांशी बाेलल्यानंतर स्पष्ट हाेते.  उलट या प्रकल्पाची वेगवान प्रक्रिया पाहता या पुनर्विकासाला दाऊद राजी असल्याचेच संकेत मिळत अाहेत. 


एकेकाळी दाऊदसह छोट्या मोठ्या गुंडांचा अड्डा असलेला भेंडी बाजार आता कात टाकतोय. हाजी मस्तान, करीम लाला, पठाण बंधू अरुण गवळी आणि दाऊद यांच्यामधील संघर्षाचा साक्षीदार असलेला हा भेंडी बाजारचा परिसर. याकूब स्ट्रीट आणि पाकमोडिया स्ट्रीट जिथे एकमेकांना मिळतात, त्या नाक्यावरच उभ्या असलेल्या चार मजली डामरवाला बिल्डिंगमध्ये दाऊदचं बालपण सरलं. 


अगदी १९८६ सालापर्यंत म्हणजेच भारतातून पलायन करण्यापूर्वीपर्यंत दाऊद इथेच होता. पुढे त्याची आई अमीनाबाई मृत्यू होईपर्यंत इथं राहिली. तिच्या मृत्यूनंतर मात्र या इमारतीचा पहिला मजला मुस्लिम मुलींच्या मदरशासाठी देण्यात आला. पुढे २००३ मध्ये प्रत्यार्पणानंतर दाऊदचा लहान भाऊ इक्बाल कासकर भारतात परतला आणि त्याने ही मालमत्ता पुन्हा ताब्यात घेतली. चौथ्या माळ्यावर वास्तव्य करत त्याने पहिल्या माळ्यावर ‘कार्यालय’ थाटले. काही महिन्यांपूर्वी या परिसरातील हुसैनी मंजिल ही इमारत कोसळल्यानंतर डामरवाला बिल्डिंग सुद्धा अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर इक्बाल कासकरनेही आपला मुक्काम बहीण हसीना पारकरच्या घरी हलवला.

 

१६ वर्षांपूर्वी खरेदीदाराला मिळाल्या हाेत्या धमक्या, अाता मात्र प्रक्रिया वेगवान
या पुनर्विकासाला दाऊदचा विरोध असल्याची चर्चा आहे. ‘दाऊदच्या भेंडी बाजारातील तीन मालमत्ता पाडल्या तर मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवू, अशा आशयाचा धमकीचा फोन एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यालयात आल्याचा दावा काही दिवसांपूर्वी माध्यमांतून करण्यात अाला हाेता.  मात्र या बातमीत काहीच तथ्य नसून दाऊदच्या संमतीशिवाय या मालमत्तांचा लिलाव झालाच नसता, अशी प्रतिक्रिया एकेकाळी मुंबईच्या गँगवॉरचे फार जवळून वृत्तांकन केलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने दिली आहे. 


सन २००१ साली
अशाच पद्धतीने लिलावात दाऊदच्या मालकीची ताडदेव येथील व्यावसायिक वापराची जागा एकाने खरेदी केली होती. त्यावेळी संबंधित व्यक्तीला दाऊदकडून धमक्या आल्या होत्या. तसेच तब्बल दहा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर संबंधित व्यक्तीला ती मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकरच्या कब्जातून सोडवण्यात यश आले होते.


आता मात्र पुनर्विकासाची होत असलेली वेगवान कारवाई पाहता दाऊद या प्रकल्पाला राजी असल्याचेच संकेत अाहेत, असे ज्येष्ठ पत्रकाराने सांगितले.  तसेच लिलाव प्रक्रियेनंतर या इमारतीतल्या भाडेकरूंनी पुनर्विकासाचे स्वागत करत आहोत, अशा आशयाच्या दिलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.


लिलावाद्वारे घेतलेल्या या सर्व मालमत्तांची खरेदी प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच डामरवाला बिल्डिंग इमारतीतील ताबेदार आणि भाडेकरूंना जागा िरकामी  करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत, अशी माहिती सैफी बुऱ्हाणी अपलीफ्टमेंट ट्रस्टच्या प्रवक्त्याने ‘दिव्य मराठी’ला दिली.


डामरवाला बिल्डिंग
- १८ निवासी व ८ व्यावसायिक गाळे. इक्बाल कासकर वगळता इतर ताबेदार व भाडेकरू याच इमारतीत
- ३२०० पैकी २००० रहिवाशांचे स्थलांतरण


प्रकल्पाला वेग देण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स
२०१४ साली सुरू झालेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला वेग देण्यासाठी म्हाडाने स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष  मिलिंद म्हैसकर  यांनी दिली. या टास्क फोर्सच्या माध्यमातून विविध टप्प्यांवर संबंधित प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या शासकीय मंजुऱ्या मिळवून देणे, तसेच असहकार्य करणाऱ्या भाडेकरूंना जागा खाली करण्याकामी ट्रस्टला मदत करणे, अशी कामे पार पाडली जाणार आहेत.

देशा-विदेशात वास्तव्यास असलेल्या दाऊदी बोहरा समाजातील धनिकांनी दिलेल्या देणग्यांद्वारे पुनर्विकासाचा निधी उभारला जाणार आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा भेंडीबाजारचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...