आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१७ लाख फ्लॅटधारकांना पाच वर्षे करवाढ नाही, राज्य मंत्रिमंडळाचा मुंबईकरांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्रफळाच्या निवासी सदनिका आणि निवासी गाळ्यांच्या मालमत्ता करात पुढील पाच वर्षे वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यामुळे सुमारे १७ लाख सदनिकाधारकांना दिलासा मिळाला अाहे. १ एप्रिल २०१५ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी हाेणार अाहे.

मुंबई महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली असून त्यानुसार विविध मालमत्तांवर कराची आकारणी केली जाते. त्यानुसार महापालिका क्षेत्रांमधील सर्वच मालमत्तांच्या करामध्ये ४० टक्के वाढ होणार आहे. त्याचा लहान सदनिकाधारकांवर बाेजा पडू नये म्हणून मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करून हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईमधील ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या लहान सदनिका आणि गाळे हे बहुतांश जुन्या इमारतींमधील आहेत. त्यांची संख्या १६ लाख ७९ हजार २६५ इतकी असून या इमारती सध्या विविध योजनांखाली पुनर्विकसित होत आहेत.

आकस्मिकता निधीत ९६२ कोटींची वाढ
महाराष्ट्र आकस्मिकता निधीची मर्यादा १५० कोटी असून त्यात जास्तीच्या ९६२ कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला अाहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी ६३०.७४ कोटी रुपये, फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेला अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २८१ कोटी आणि जलयुक्त शिवार अभियानासाठी जलसंधारण विभागास अतिरिक्त ५० कोटी रुपये निधी देण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...