आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relief To Ex. Minister Vijay Gavit By State Government

माजी मंत्री डाॅ. गावित यांना क्लीनचिट, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी मंत्री व भाजप अामदार डाॅ. विजयकुमार गावित यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व राज्य सरकारने क्लीन चिट दिली अाहे. त्यांच्याविराेधात काेणतेही पुरावे न सापडल्याचा अहवाल ‘एसीबी’ने बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला अाहे.

अाघाडी सरकारच्या कार्यकाळात अादिवासी विकास मंत्री असताना काेट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा अाराेप त्यांच्यावर हाेता. या प्रकरणी गावित यांची खुली चाैकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्ही. अार. मुसळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली हाेती. न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमाेर बुधवारी त्याची सुनावणी झाली. ‘एसीबी’ने या प्रकरणाचा अहवाल बंद लखाेट्यात न्यायालयाला सादर केला अाहे. त्यात गावित, त्यांच्या पत्नी कुमुदिनी आणि बंधू शरद या सर्वांनाच क्लीन चिट देण्यात अाली अाहे. ‘हा अहवाल गावितांच्या बाजूने आहे. त्यांची उघड चौकशी आता पुढे सुरू ठेवू नये, असे मत एसीबीच्या महासंचालकांनी न्यायालयाला दिलेल्या अहवालात नमूद केले अाहे. त्यामुळे ही याचिका अाता न्यायालयाने फेटाळून लावावी,’ अशी मागणी गावित यांचे वकील महेश जेठमलानी यांनी केली. दरम्यान, एसीबीच्या अहवालाशी राज्य सरकारही सहमत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले अाहे.

दरम्यान, जेठमलानींच्या मागणीला याचिकाकर्त्यांचे वकील उदय वाळंुजकर यांनी अाक्षेप घेतला. ‘माहितीच्या अधिकारात एसीबीच्या या अहवालाची प्रत मिळवण्यासाठी अाम्ही प्रयत्न करू. त्यामुळे न्यायालयाने अाम्हाला अामची बाजू मांडण्याची संधी द्यावी.’ वाळुंजकरांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने अाता या प्रकरणाची सुनावणी जून महिन्यात ठेवली अाहे.

मंत्रिपदासाठी मार्ग मोकळा?
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू अाहेत. उत्तर महाराष्ट्रात, खासकरून धुळे-नंदुरबार पट्ट्यात भाजपचा जम बसवण्यासाठी डॉ. गावित यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला मंत्रिपद देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू अाहे. त्यातच अाता डाॅ. गावितांना क्लीन चिट मिळाल्याने त्यांच्या मंत्रिपदाचा मार्ग माेकळा झाल्याचे मानले जाते.

राष्ट्रवादीतून भाजपात
डाॅ. विजयकुमार गावित पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. सध्या भाजपचे नंदुरबारचे अामदार. त्यांच्या कन्या डाॅ. हिना या भाजपच्या खासदार अाहेत. अाघाडीचे सरकार असताना डाॅ. गावित अादिवासी विकास मंत्री हाेते. या काळात त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या ‘एसीबी’कडे तक्रारी दाखल हाेत्या. तसेच मंत्रिपदी असताना भ्रष्टाचाराचेही त्यांच्यावर अाराेप अाहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये गावितांना भाजपने अापल्या पक्षात प्रवेश देऊन विधानसभेला नंदुरबारमधून निवडूनही अाणले. त्यामुळे भाजपवर माेठी टीका झाली. मात्र, त्याच वेळी ‘चाैकशीत दाेषी अाढळल्यास त्यांना पक्षातून काढून टाकू’ अशी घाेषणा भाजपने केली हाेती.