मुंबई - मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि तुळजापूरचे भवानी मंदिर यासारख्या प्रसिद्ध देवस्थानांवरील सरकारचे नियंत्रण रद्द करून ही देवस्थाने भक्तांच्या हाती द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात
येणार आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजित केलेल्या सुवर्ण जयंती महोत्सवांतर्गत १४ डिसेंबर रोजी मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनात जगद्गुरू नरेंद्राचार्य, योगी आदित्यनाथ, भदन्त डॉ. राहुल बोधीजी महाथेरो, साध्वी सरस्वती, रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे तसेच विहिंपचे संरक्षक अशोक सिंघल आणि आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया आदी मार्गदर्शन करणार आहेत.
देशातील मुस्लिमसुद्धा मूळचे हिंदू धर्मीयच
साध्वी निरंजन ज्योती यांच्या संसदेतल्या वक्तव्याचा वाद ताजा असताना आज विहिंपच्या व्यंकटेश आबदेव यांनीही तशाच स्वरूपाचे एक वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लिम हेसुद्धा मूळचे हिंदूच असल्याचे खळबळजनक विधान त्यांनी केले. इस्लाम हा फक्त चौदाशे वर्षे जुना असून हिंदू धर्माला १ अब्ज ९६ कोटी ८७ लाख वर्षांचा इतिहास असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मुस्लिम हे हिंदूच असल्याचा दावा त्यांनी केला.
पुन्हा रामजन्मभूमी
विश्व हिंदू परिषदेच्या या संमेलनात रामजन्मभूमीच्या मुद्द्यावरही विस्तृत स्वरूपात चर्चा करण्यात येणार आहे. राम मंदिराला होणारा विरोध हळूहळू मावळू लागला असल्याने आता सरकारी पातळीवर याबाबत हालचाल होणे गरजेचे असल्याचे मत आबदेव यांनी मांडले.
लव्ह जिहाद, सागरी सुरक्षेवर परिसंवाद
मुंबईत होणा-या या संमेलनात काही प्रमुख ठराव पारित करण्यात येणार आहेत. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सरकारी पातळीवर त्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. यापैकी प्रमुख ठराव हा सरकारी यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या राज्यातल्या प्रमुख देवस्थानांशी संबंधित आहे. राज्यातल्या प्रमुख देवस्थानांमधील सरकारी हस्तक्षेप पूर्ण बंद करावा आणि त्यातून दान स्वरूपात मिळणारा निधी हा धार्मिक काम, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक कामासाठी खर्च करावा, अशी मागणी करणारा ठराव आणि त्यावर चर्चा या संमेलनात होणार असल्याची माहिती विहिंपचे प्रवक्ते व्यंकटेश आबदेव यांनी दिली. या व्यतिरिक्त देशात गोहत्या बंदी विधेयक, हिंदूंच्या सणात होणारा सरकारी हस्तक्षेप थांबवणे, लव्ह जिहाद, सागरी सुरक्षा आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी प्राधिकरण यासारख्या विषयावरही चर्चा आणि परिसंवाद होणार आहेत. या चर्चा आणि परिसंवादाचा उद्देश सरकारचे या विषयांवर लक्ष वेधणे आणि जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हा असल्याचे आबदेव म्हणाले.
विहिंप औषधे, सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीत
हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडणा-या विश्व हिंदू परिषदेने आता गोमूत्र आणि शेणापासून औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती सुरू केली आहे. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांवर तब्बल ४८ औषधे विहिंपने तयार केली असून गोमूत्रापासून तयार होणा-या विविध आठ वस्तूंचे पेटंटसुद्धा मिळवले आहे. उत्तम आरोग्यासाठी ही औषधे फायदेशीर असल्याचा दावाही परिषदेतर्फे केला जात आहे.