आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Renowned Islamic Scholar, Author And Reformist Asghar Ali Engineer Passes Away

जातीय सलोख्यासाठी झटणारे सुधारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1940 मध्ये जन्मलेल्या असगर अली इंजिनिअर यांनी विक्रम विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयात बीएससी केले. 1980 सालापासून त्यांनी ‘द इस्लामिक पर्स्पेक्टिव्ह’ हे नियतकालिक सुरु केले. 1980च्या दशकात त्यांनी इस्लामी तत्वज्ञान, सामाजिक सुधारणा या विषयांवर काही पुस्तके प्रकाशित केली. त्याचबरोबर भारतातील जातीय हिंसाचार या विषयावरही त्यांनी काही पुस्तके प्रकाशित केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात जातीय हिंसाचाराची जी प्रकरणे घडली त्यांच्या मुळाशी जाऊन इंजिनिअर यांनी त्यांचा अभ्यास केला होता. समाजात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर अविरत प्रयत्न केले. हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबविले. सेक्युलर विचारसरणीवर अत्यंत गाढ निष्ठा असलेल्या असगर अली इंजिनिअर यांनी इस्लाम धर्मामध्येही योग्य सामाजिक सुधारणा व्हाव्यात यासाठी जीवाचे रान केले. त्यामुळे त्यांच्यावर कट्टरपंथीयांकडून जोरदार टीकाही झाले. एक-दोन वेळा त्यांच्यावर शारिरिक हल्लेही झाले, पण अशा संकटांमुळे डगमगून माघार घेण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.

उत्तम सेवाभावी कार्याबद्दल 1987 मध्ये इंजिनिअर यांना यूएसए इंटरनॅशनल स्टुडंट असेंब्ली व यूएसए इंडियन स्टुडंट असेंब्लीने विशेष पुरस्कार प्रदान केला होता. जातीय सलोखा कायम राहाण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल 1990 साली त्यांना दालमिया पुरस्कार मिळाला होता. तसेच आजवर त्यांना तीन मानद डॉक्टरेट पदव्यांनीही सन्मानित करण्यात आले होते.

1992 मध्ये अयोध्येमध्ये बाबरी मशीद उद््ध्वस्त करण्यात आली ही स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील मोठा कलंक आहे. या घटनेनंतर मुंबईमध्ये खूप मोठी जातीय दंगल झाली. त्यानंतर देशद्रोही प्रवृत्तींनी मुंबईत घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. समाजातील हा जातीय विद्वेष व हिंसाचार पाहून विलक्षण अस्वस्थ झालेल्या असगर अली इंजिनिअर यांनी 1993 मध्ये ‘सेंटर फॉर स्टडी अँड सेक्युलॅरिझम’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ते अध्यक्ष होते. जातीय सलोखा प्रस्थापित करणे तसेच समाजसुधारणेच्या कार्याला चालना देणे ही सीएसएसएसची मुख्य उद्दिष्टे होती. त्यानंतर आजपावेतो असगर अली इंजिनिअर यांनी या संस्थेच्या कार्यालाच स्वत:ला वाहून घेतले होते. असगर अली इंजिनिअर यांनी 52 पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे अनेक शोधनिबंध व लेख लिहिले. ते ‘इंडियन जर्नल फॉर सेक्युलॅरिझम’ या नियतकालिकाचे संपादन करीत असत. त्याचप्रमाणे दर महिन्याला ‘इस्लाम अँड मॉडर्न एज’ ही पत्रिका त्याचप्रमाणे दर पंधरवड्याला ‘सेक्युलर परस्पेक्टिव्ह’ हे पाक्षिकही ते प्रसिद्ध करीत असत.

बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारकाला देश मुकला
इंजिनिअर यांच्या निधनाने देश एका थोर व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे. ते निर्भीड वृत्तीचे व बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक होते. कोणत्याही धर्मातील संकुचित विचारांची कुंपणे ओलांडूनच समाजाला स्वत:मध्ये सुधारणा घडवावी लागते, अशी त्यांची धारणा होती.’’ - फादर सेड्रिक प्रकाश एसजे

जातीय विद्वेष पसरवणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात असगर अली इंजिनिअर ठामपणे उभे राहिले. जातीय हल्लेविरोधी विधेयक 2011 हे संसदेत संमत व्हावे यासाठी त्यांनी देशभर जनजागृती केली. पाठ्यपुस्तकांमध्ये इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या विरोधातही आघाडी उघडली होती. ’’ - तिस्ता सेटलवाड, समाजसेविका

इंजिनिअर यांच्या पुरोगामी भूमिकेमुळे त्यांच्या पत्नीचा दफनविधी कुर्ला येथील बोहरा समाजाच्या कब्रस्तानमध्ये करण्यास विरोध झाला होता. त्यामुळे आपला दफनविधी सांताक्रूझ येथील सुन्नी कब्रस्तानमध्ये करावा, अशी त्यांची अंतिम इच्छा होती. ’’ - इरफान, इंजिनिअर यांचा मुलगा