आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इच्छाशक्तीचा दुष्काऴ; मुख्‍यमंत्र्यांच्‍या दौऱ्यानंतरही दुष्‍काळाची घोषणा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भीषण दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याचा मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या तीन मंत्र्यांनी दौरा केला, तरीही दुष्काळाची अधिकृत घोषणा करण्यासाठी मात्र भाजप उपसमितीचा फार्स रचत अहवालाची वाट पाहणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती १५ दिवसांत अहवाल देणार आहे. यामुळे दुष्काळाची घोषणा तीन आठवडे लांबणीवर पडली आहे. दरम्यान, दुष्काळ घोषणेच्या मागणीवरून सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत सरकारला चांगलेच धारेवर धरले.

विरोधकांनी दुष्काळाचे भांडवल करत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. जनतेतही नाराजीचे वातावरण आहे. तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत शिवसेनेचे मंत्री बैठकीत आक्रमक झाले. त्यानंतरही उपसमिती नेमून अहवाल आल्यावर दुष्काळ जाहीर करण्यावर निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याचे कळते. वास्तविक खुद्द फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दुष्काळाची पाहणी केली आहे.

परभणी, नगर जिल्ह्यांत चारा छावण्या काढणार
बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तालुकास्तरावर चारा छावण्या सुरू आहेत. आता परभणी, नगर, सोलापूरच्या पशुपालकांना रोख रक्कम देण्याऐवजी चारा छावण्या सुरू करण्यात येतील. परभणीसह जिंतूर, गंगाखेड, पाथरी, पूर्णा, पालम, सेलू व मानवतला छावण्या होतील.
भाजप विरुद्ध शिवसेना
एकनाथ खडसे म्‍हणाले, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, सांगली, नाशिक, बुलडाणा, जालना, नगर जिल्ह्यांच्या ६९ तालुक्यांत टंचाईसदृश स्थिती आहे. तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
------------
दिवाकर रावते म्‍हणाले, दुष्काळावर आता चर्चा करण्याऐवजी निर्णय घेणे गरजेचे आहे. सतत चौथ्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ असल्याने लोक मोठ्या संख्येने स्थलांतर करत आहेत. मदतीचा हात देणार नसाल तर लोकांना सरकारविषयी आस्था वाटणार नाही.

दुष्काळासाठी केंद्राचे निकष
१. जून ते जुलैपर्यंत सरासरीच्या ५०%पेक्षा कमी पाऊस. मान्सून काळात सरासरीच्या ७५%पेक्षा कमी झाल्यास. संपूर्ण मान्सून काळात दोन आठवड्यांवर दडी मारल्यास.
२. धरणातील जलसाठा ०.४ किंवा त्यापेक्षा कमी असल्यास.
३. भूजलाची पातळी चार मीटरपेक्षा खालावलेली असल्यास दुष्काळ.
४. लागवड क्षेत्राच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण ५०%पेक्षा कमी असणे
५. पैसेवारी, चाऱ्याची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता.