आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेते अनिल परब म्हणाले- \'राजकारणात कोणीच अस्पृष्य नसतो, महापौर आमचाच होणार\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मुंबई महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, कोणाच्या पाठिंब्याने सेनेचा महापौर होईल हे सांगण्याचे त्यांनी टाळले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास जनता माफ करणार नाही, असे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष गुरुदास कामत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस समोर सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले आहे. वास्तविक शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील असेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची चर्चा सुरु केल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू मंडळींनी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. 23 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेला 84 तर भाजपला 81 जागा मिळाल्या आहेत. 31 जागा असलेल्या काँग्रेसच्या मदतीने सत्तेचा सोपान चढण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे कळते. शनिवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे. 
 
काय म्हणाले अनिल परब 
- अनिल परब यांनी युती होईल किंवा नाही यावर भाष्य करण्याचे टाळले. काँग्रेसचा पाठिंबा घेतला जाईल का, या प्रश्नावरही त्यांनी तो काँग्रेसचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.
- दुसरीकडे, सेनेला कोणताही दगाफटका होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
- एका प्रश्नाच्या उत्तरात परब म्हणाले, \'राजकारणात कोणीच असृष्य नसतो. तसे असते तर भाजपने काश्मीरमध्ये महेबुबा मुफ्तींसोबत युती केली नसती.\'
- युती तुटल्याने शिवसेनेला आपले सामर्थ्य कळाले.  
महापौर शिवसेनेचाच - परब 
मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 हा जादुई आकडा असल्याचे परब यांनी नाकारले आहे. ते म्हणाले, महापालिकेत महापौर पदासाठी निवडणूक होते. त्या दिवशी ज्या पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात तो महापौर होतो. त्यामुळे फ्लोअर मॅनेजमेंट हे महत्वाचे असते. त्यामध्ये शिवसेना यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
काँग्रेसने ठेवली ही अट ?
- एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुंबईतील परिस्थितीवर शुक्रवारी बैठक झाली. राज्य पातळीवरील नेते सर्वसंमतीने यावर निर्णय घेतील. 
- चव्हाण या बैठकीला उपस्थित नव्हते. ते कराडमध्ये आहेत. ते म्हणाले, \'काँग्रेस समोर सर्व पर्याय खुले आहेत. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय राज्य पाथळीवरील नेतृत्व घेईल मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील.\'
- मात्र महापालिकेतील पाठिंब्यासाठी शिवसेनेला सत्ता सोडण्याची अट काँग्रेस ठेवू शकते, अशीही चर्चा आहे. 
 
जनता माफ करणार नाही - गुरुदास कामत 
- काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास जनता माफ करणार नाही, असे मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी म्हटले आहे. 
- कामतांनी एक पत्रक शनिवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार, शिवसेनेला पाठिंबा देण्यास ते उत्सूक नाहीत. काँग्रेसने असे केल्यास जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाईल असे त्यांचे मत आहे.
 
उपमहापौर पद देण्याची तयारी - सूत्र 
- सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात द इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे, की काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा मिळवून शिवसेना बहुमत सिद्ध करण्याची तयारी करीत आहे.
- \'शिवसेनेने काँग्रेसला उपमहापौर पदाची ऑफर दिली आहे, जेणे करुन बहुमत सिद्ध करताना कोणतीही अडचण येणार नाही.\'
- मुंबई महापौरपदाची निवड 9 मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी शिवसेना आणि भाजप यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. 
 
सेनेच्या प्रस्तावावर महाराष्ट्र काँग्रेस करणार विचार 
- मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी एक बैठक बोलावली होती. त्यात शिवसेनेच्या प्रस्ताववर चर्चा झाली. 
- या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, मुंबई प्रमुख संजय निरुपम, खासदार हुसैन दलवाई, माजी मंत्री नसीम खान आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 
- काँग्रेसच्या बैठकीनंतर अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, की शिवसेनाच प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यावर विचार केला जाईल. 
- सत्तार म्हणाले, भाजप मुख्य विरोधक आहे. शिवसेनेचा अधिकृत प्रस्ताव आल्यानंतर राज्यातील नेते त्यावर एक प्रस्ताव हायकमांडला पाठवतील. त्यात केवळ मुंबई महापालिका नाही तर इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला सहकार्य करण्यावर चर्चा होईल. 
 
शिवसेनेला 3 अपक्षांचा पाठिंबा 
- शिवसेनेचे स्वबळावर 84 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यासोबतच शुक्रवारी 3 बंडखोर स्वगृही परतल्याने त्यांचे संख्याबळ 87 झाले आहे. 
   
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...