आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीची माहिती देताना कदम, रावतेंची वेगळी चूल; मुख्यमंत्र्यांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी दसऱ्यापूर्वी व्हावी यासाठी सोमवारपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. राज्यभरात मोर्चे काढण्यासोबतच शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेगवेगळी देऊन शिवसेनेत आलबेल नसल्याचे दाखवून दिले.  दरम्यान, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले.

सोमवारी दुपारी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्य सरकारने २८ जून रोजी जाहीर केली याला आता ७४ दिवस उलटले आहेत. या अडीच महिन्यांच्या काळात कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी नाराज आहे. खरीप हंगामासाठी बँकांनी कर्ज दिलेले नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. खरीप हंगामात कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. निदान रब्बीत तरी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून कर्जमाफीची अंमलबजावणी त्वरित करून नवरात्रीत तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला तर रब्बी हंगामासाठी शेतकरी पेरते होतील. त्यामुळे १ ऑक्टोबरऐवजी २१ सप्टेंबरपासूनच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.  

मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर रामदास कदम यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, दादा भुसे हे मंत्री उपस्थित होते. रामदास कदम म्हणाले, कर्जमाफीची घोषणा होऊन ३ महिने झाले तरी शेतकरी आत्महत्या होत आहेत. कर्जमाफीची अंमलबजावणी तत्काळ झाली पाहिजे ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. दिवाळीपर्यंत न थांबता कर्जमाफीचे पैसे नवरात्रीत जमा झाले तर काही आत्महत्या थांबतील. मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले आहे.
 
रब्बीला कर्ज उपलब्ध व्हावे- दिवाकर रावते   
दुसरीकडे दिवाकर रावते यांनीही त्यांच्या दालनात पत्रकारांना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. दिवाकर रावते म्हणाले, खरिपाचा हंगाम गेला. त्यामुळे रब्बीच्या हंगामाला तरी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. दसऱ्यापर्यंत सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजेत, अशी आग्रही मागणी आम्ही केली असून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. दोन मंत्र्यांनी एकाच विषयावर प्रतिक्रिया दिल्याने शिवसेनेत नक्की काय चालले आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.
बातम्या आणखी आहेत...