आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जातवार आरक्षण नको : राज; पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा आरक्षण का दिले नाही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जातवार आरक्षण न देता आर्थिक निकषावर दिले असते तर आज जातीजातीत द्वेष निर्माण झाला नसता, असे मत व्यक्त करत सर्व प्रकारच्या आरक्षणास आपला पूर्ण विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. शिस्तबद्ध पद्धतीने निघणाऱ्या मराठा मोर्चाचे त्यांनी कौतुक आणि अभिनंदनही केले. देशाच्या इतिहासात असे मोर्चे पहिल्यांदाच निघत असून पंतप्रधान मोदी यांना आपण आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे येथे मनसेचा रविवारी मेळावा पार पडला. त्या वेळी राज यांनी आरक्षण आणि मराठा मोर्चांबाबत आपली भूमिका मांडली. पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी नको, या सलमान खानच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. देशापुढे मला कोणी दोस्त वगैरे नाही, असे ते म्हणाले. ब्राह्मण मुख्यमंत्री झाला म्हणून मोर्चे निघत असतील तर ती बाब वाईटच आहे. इतके दिवस मराठा मुख्यमंत्री होते, मग तुमचे हीत का नाही झाले, असा सवालही त्यांनी िवचारला.

राज्यात आणि केंद्रात गेली पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. मग मराठ्यांना आरक्षण का नाही मिळाले, असा प्रश्न त्यांनी केला. शरद पवार मराठा आरक्षणाबाबत तावातावने बोलू लागले आहेत. कारण जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर त्यांचा डोळा आहे. मराठा मोर्चाचे लाभ पवार यांना पदारात पाडून घ्यायचे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवा, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीची त्यांनी खिल्ली उडवली. विशेष अधिवेशनात आरक्षणाचा ठराव कराल, पण केंद्रात तो पाठवणार का ? असा प्रश्न उपस्थित करत विशेष अधिवेश घेण्यापूर्वी आरक्षणाबाबत शिवसेनेने भूमिका तरी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. सवर्णांना २५ टक्के आरक्षण देण्याच्या रामदास आठवले यांच्या मागणीची त्यांनी टिंगल उडवली. सधन दलितांना आरक्षणाचा लाभ कशासाठी, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्राॅसिटी) तरतुदींमुळे त्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत अाहे. कोणताही कायदा असो, त्याचा कोणत्याही समाजाला त्रास होत असेल तर त्यातील तरतुदी बदलायला हव्यात, असे मत राज यांनी मांडले. आर्थिक लाभापोटी आणि बदला घेण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येकवेळी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बोलले पाहिजे असे नाही. ठाण्यात सात महानगरपालिका बनल्या आहेत, त्या केवळ परप्रातीयांच्या लोंढ्यामुळे, अशीच बाहेरची माणसे येत गेली तर राज्याचा बिहार होईल, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात मराठा, दलीत, ओबीसी असे जातवार मोर्चे िनघू लागले अाहेत. हे सर्व गलीच्छ राजकारणाचे पाप आहे. त्यामुळे जातीजातीत व्देष वाढला आहे, त्यास मंडल आयोग लागू करणारे नतदृष्ट पंतप्रधान व्ही.पी. सिंग जबाबदार अाहेत, अशी टिका राज यांनी केली.

घोडे कुठे अडले
राज्यातले चारी मोठे पक्ष मराठा आरक्षणाबाबत सहमत आहेत, मग गेली पंधरा वर्षे मराठ्यांना का आरक्षण नाही िमळाले, कुठे घोडे अडले आहे, असा सवाल राज यांनी केला. मराठा आरक्षणाचा उपयोग सर्वच पक्ष केवळ राजकारणासाठी करत आहेत, मग मराठा मोर्चाच्या शक्तीचा उपयोग काय, असा सवाल करत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आिण शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
बातम्या आणखी आहेत...