आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Resignation Means Sharad Pawar Battle With Congress

मंत्र्यांचे राजीनामे म्हणजे शरद पवारांचा काँग्रेसला शहच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जेव्हा गंडांतर येते, तेव्हा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार त्यांच्याविरोधी भूमिका घेऊन ते रोखून धरतात. आपल्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेताना पवार यांनी दुहेरी चाल खेळली असून पक्षातील साचलेपण दूर करण्याचा प्रयत्न दाखवताना त्यांनी काँग्रेसलाही मोठा राजकीय शह दिला आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली केंद्रात सुरू झाल्यानंतर पवारांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री कायम राहतील, अशी राजकीय खेळी खेळल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.


दिल्ली काँग्रेस वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री हायकमांडला योग्य वाटत नव्हते. निवडणुका लढण्यासाठी नेत्याकडे संघटना मजबूत करणे, निधी जमवण्याचे कौशल्य लागते. तसेच करिष्मादेखील लागतो. यातील एकही कौशल्य पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नाही. काँग्रेसच्या ‘रँक अँड फाइल’ (सर्व कार्यकर्त्यांमध्ये ) प्रचंड अस्वस्थता आहे. या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपले काय होणार या चिंतेने नेत्यांना ग्रासले आहे. अशा दोलायमान परिस्थितीत काँग्रेस आहे.

विरोधी पक्ष जवळजवळ संपुष्टात आले असताना राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस सध्याचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीला हवे आहेत. अशा परिस्थितीतच पवारांनी आपल्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन राजकारणाचे चित्र एकदम पालटवून टाकले, असे काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन मंत्री बदलायचे असताना सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यामागचा पवारांचा उद्देश काँग्रेसच्या नेत्यांना कळलाच नाही. राष्ट्रवादीने फेरबदल केले तरी त्यांचे ताकदवान मंत्री मंत्रिमंडळात नक्कीच राहतील.


काँग्रेसच्या हातून महत्त्वाचा काळ निघून जाईल
संवैधानिक पदावर असलेल्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याने आपल्या समर्थकांकरवी फेरबदलांबाबत काही वृत्त पेरण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यामुळे पक्षामध्ये असलेले मतभेद-साचलेपण पवारांनी एका झटक्यामध्ये घालवले, पण काँग्रेसलाही राजकीय शह देऊन पेचात अडकवले. त्यामुळे निवडणुकांपूर्वीचा महत्त्वाचा वेळ त्यांच्या हातातून निघून जाईल.