आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचा आज ‘निकाल’ लागणार ?, एमआयएमची मते घटण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना विरुद्ध माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील निकराच्या लढाईमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी लागणार आहे. ‘मातोश्री’च्या अंगणात झालेली ही निवडणूक शिवसेनेच्या प्रतिष्ठेची, तर पाच महिन्यांत दुस-यांदा विधानसभा निवडणुकीला सामाेरे जाणा-या राणेंच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे.

फक्त ३९ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत शिवसेना निसटत्या फरकाने बाजी मारेल, असे राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केले जात आहेत. असे असले तरी शेवटच्या टप्प्यात मुस्लिम भागात झालेले माेठ्या प्रमाणावरील मतदान ‘एमआयएम’एेवजी काँग्रेसच्या म्हणजेच राणेंच्या पदरात पडल्यास परिस्थिती बदलू शकते, अशी शक्यताही वर्तवली जाते.

शिवसेनेचा धडाडीचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या बाळा सावंत यांच्या निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत राणेंच्या उमेदवारीने रंग भरले. विधानसभेत तळकाेकणातील कुडाळमध्ये एका शिवसैनिकाकडून पराभूत झाल्याने राणेंच्या राजकीय अस्तित्वाला घरघर लागली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी राणेंनी वांद्र्यात उभे राहून थेट मातोश्रीला आव्हान दिले. बेहरामपाडा, भारतनगरचा मुस्लिम भाग पिंजून काढत राणेंनी या एकेकाळच्या काँग्रेसच्या ‘व्हाेटबँके’ला विकासाचे स्वप्न दाखवत मते मागितली.
‘एमआयएम’ला मते देणे म्हणजे शिवसेनेचा विजय, असा धूर्त प्रचारही राणेंनी केला. यामुळे मागच्या वेळी चौथ्या क्रमांकावर फेकली गेलेली काँग्रेस राणेंमुळे आता या पोटनिवडणुकीच्या लढाईत प्रमुख स्पर्धक बनली आहे.

मीच विजयी होणार; नारायण राणेंचा दावा
मतदानाच्या एका सर्व्हेनुसार शिवसेनेच्या तृप्ती सावंतांना ३८ टक्के, तर राणेंना ३४ टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. एमआयएमची मतांची टक्केवारी २२ % असेल. पण राणेंच्या मते एमआयएमला एवढी मते पडणारच नाहीत. मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात ४७ टक्के मतदान झाले होते. मात्र, आता त्यात ८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एमआयएमचे रेहबर खान यांना आॅक्टोबरमध्ये २१ हजार मते मिळाली असली तरी आता १२ हजारांवरच समाधान मानावे लागेल. एमआयएमची घटलेली मते माझ्या विजयाला हातभार लावतील, असा दावा राणेंनी केला.

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना विजयाचा अति आत्मविश्वास
शिवसेनेचे नेते मात्र सुरुवातीपासूनच विजयाच्या आविर्भावात वावरत आहेत. या निवडणुकीची मुख्य जबाबदारी असलेल्या आमदार अनिल परब यांच्या मते तृप्ती सावंत १५ हजारांनी निवडून येतील. मतदानाच्या दिवशी सकाळपर्यंत मराठीबहुल भागात शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे दिसत होते. मात्र, दुपारनंतर नीलेश व नितेश या राणेपुत्रांना मतदारांना प्रभावित करत असल्याच्या आरोपावरून पाेलिसांनी अटकाव केल्याने चित्र बदलले. राणेंच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी शिवसेनेच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांनाही मतदारांना प्रभावित करण्यापासून रोखले. याचा परिणाम होऊन शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर कमी मतदान झाले. मात्र, त्याच वेळी राणेंना आता कुठल्याही परिस्थितीत जिंकून आणायचेच, या ईर्षेने शेवटच्या टप्प्यात मुस्लिम मतदारांनी मतदान केल्याचे सांगितले जाते.