आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Results For Kalyan Dombiwali MNC Election Are Today

शिवसेनेचे ‘कल्याण’, कोल्हापुरातही सत्तेची चावी!, महापालिकेचा आज निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिकेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत रविवारी किरकाेळ घटनांचा अपवाद वगळता गेल्या वेळच्या जवळपासच सरासरी ४७ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ४६.४९ टक्के मतदान झाले हाेते.

शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या ग्रामीण भागात झालेले उत्स्फूर्त मतदान व भाजपची ‘व्हाेट बॅंक’ मानल्या जाणाऱ्या शहरी भागातील मतदारांनी दाखवलेला निरुत्साह पाहता यंदाही गतवेळप्रमाणेच शिवसेनेचे पारडे भाजपपेक्षा जड ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात अाहे. विशेष म्हणजे ज्या २७ गावांना महापालिकेतून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता, त्या गावांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदान केल्याचे दिसून अाले.

राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली अाहे. एकूण १२२ पैकी ११७ वाॅर्डमधील एक हजार दहा मतदान केंद्रावर मतदान पार पडले. तर दोन वाॅर्डांत एकाही उमेदवाराने निवडणूक अर्ज दाखल न केल्याने तसेच तीन वाॅर्डांत निवडणूक बिनविरोध झाली हाेती. त्यामुळे या पाच प्रभागांत मतदान झाले नाही.

वगळलेल्या गावांचा भाजपविरोधात कौल?
कल्याण- डाेंबिवली महापालिका क्षेत्रातून २७ गावे वगळण्याचा निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे नंतर हा निर्णय स्थगित करावा लागला. ही गावे महापालिका क्षेत्रातून वगळण्याच्या बाजूने असलेल्या संघर्ष समितीने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या २७ गावांमध्ये महापालिकेचे तब्बल २१ प्रभाग असून रविवारी सकाळपासूनच या परिसरातील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. एकूणच मतदारांचा प्रतिसाद पाहता नागरिकांनी महापालिकेत राहण्याच्या बाजूने कौल दिल्याचे बोलले जात असून त्याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.

भाजप उमेदवाराला मनसेची मारहाण
गेल्या दोन दिवसांपासून मनपा क्षेत्रात राजकीय तणाव आहे. त्यामुळे पोलिसांनी माेठा बंदोबस्त तैनात केला होता. संध्याकाळी डोंबिवलीतील पाथर्ली भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराला मारहाण केली. आपल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तलवारीने हल्ला केल्याचा आरोप जखमी उमेदवार नितीन पलण यांनी केला आहे. तर कल्याणच्या लक्ष्मीबाग मतदान केंद्रावर बोगस मतदानासाठी आलेल्या दाेघांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

निकाल ठरवणार युतीचे भवितव्य
कल्याण- डाेंबिवली निवडणुकीत शिवसेनेचा एकहाती विजय झाल्यास भविष्यात शिवसेना राज्यातील सत्तेत अधिक आक्रमक धोरण स्वीकारेल असा अंदाज आहे. तर भाजपने शिवसेनेपेक्षा अधिक जागा जिंकल्यास भविष्यातही भाजप शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी साधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल एक प्रकारे युतीचे भवितव्यच ठरवणारा असेल.

काेल्हापुरात ७० टक्के, इथेही सत्तेची चावी शिवसेनेकडे ?
शिवसेना-भाजपने स्वतंत्र लढून प्रतिष्ठेच्या केलेल्या काेल्हापूर महपालिकेसाठी रविवारी सरासरी ७० टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीतही या ठिकाणी सरासरी ६७.६९ टक्के मतदान झाले हाेते. एकूण परिस्थिती पाहता ८१ सदस्य असलेल्या या पालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता असून, सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात अाहे. साेमवारी निकाल जाहीर हाेणार अाहे. यावेळी मतदानाचा टक्का काहीसा वाढला असला तरी उमेदवारांचीही संख्या वाढली अाहे. शिवसेना, भाजप, काॅंग्रेस व राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्र लढत अाहेत. भाजपची ताराराणी गटाची अाघाडी असून १३१ अपक्षही रिंगणात आहेत.