आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचा अस्थिकलश पाेलिसांनी परत करावा, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन विधान भवनावर धडकलेले शेतकरी विजय जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील अस्थिकलश पोलिसांनी हिसकावून घेतला. हा अस्थिकलश जाधव यांना परत द्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी केली.
 
नाशिक येथे शिवसेनेच्या शेतकरी अधिवेशनात विजय जाधव अस्थिकलश घेऊन सहभागी झाले होते. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी जाधव हे रविवारी मुंबईत दाखल झाले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमुक्ती मिळावी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जाधव हे विधानभवन गेटवर निदर्शने करणार होते. मात्र, तत्पूर्वीच रविवारी मध्यरात्री मरीन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. नीलम गोऱ्हे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शेतकरी कर्जमुक्ती आणि जाधव यांना पोलिसांनी केलेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी जाधव यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते, फक्त अस्थिकलश होता.

मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडून अस्थिकलशही ताब्यात घेतला. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे या प्रकरणाची सरकारने दखल घेऊन त्यांची सुटका करावी, अस्थिकलश परत देण्यात यावा, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना सभागृहनेते चंद्रकांत पाटील म्हणाले, आझाद मैदानात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दखल घेऊन त्यांची भेट घेतली आहे.
 
मुंडणाचा मुद्दा गाजला
उल्हासनगरयेथे दोन अल्पवयीन मुलांवर चोरीचा आळ घेऊन त्यांचे अर्धमुंडण करून गळ्यात चपलांचा हार घातल्याचा प्रकार घडला होता. हा मुद्दाही आमदार विद्या चव्हाण यांनी विधान परिषदेत उपस्थित करुन कारवाईची मागणी केली. त्यावर शासनाने गंभीर दखल घेतली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...