आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जैतापूर’वरून पुन्हा वाद, मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांची परस्पर विरोधी वक्तव्ये सुरुच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, साेलापूर - रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेमधील वाद वाढतच चालला अाहे. ‘इतर काेणाहीपेक्षा अामच्यासाठी राष्ट्रहित महत्त्वाचे अाहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प होणारच,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी साेलापुरात ठणकावून सांगितले, तर शिवसेनेकडून काही तासांतच त्याला तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर देण्यात आले. ‘आमच्या पक्षाचा जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम असेल. स्थानिक लोकांचे हित नसेल तर अशा विकासाचा फायदा काय?’ असा सवाल शिवसेनेचे सचिव व राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांनी उपस्थित केला.

जलयुक्त शिवाय याेजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी फडणवीस साेमवारी साेलापूर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर अाले हाेते. जिल्हाधिकारी कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत त्यांनी जैतापूर प्रकल्प हाेणारच असे ठासून सांगितले. ‘जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प हा देशासाठी महत्त्वाचा आहे. कोणाला काय वाटते, यावर प्रकल्प होत नसतात. या प्रकल्पाची उभारणी खूप वेगाने सुरू असून तो बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणाला काय वाटते, यापेक्षा राष्ट्राचे हित, विकास महत्त्वाचे अाहे,’ असा टाेला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

एवढा विराेध असताना जबरदस्ती कशाला?
‘शिवसेना जैतापूरवासीयांच्या पाठीशी आहे. त्यांना हा प्रकल्प नको आहे. स्थानिकांचा विराेध असताना त्यांच्या माथी आपण हा प्रकल्प जबरदस्तीने मारू शकत नाही. शेवटी विकास हा लाेकांसाठी असतो. पण तो हाेत असताना त्यांची मतेही विचारात घेतली गेली पाहिजेत’, असे देसाईंनी स्पष्ट केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विधानाचा विपर्यास करून शिवसेनेचा विरोध मावळला असल्याचे वृत्तही खरे नसल्याचे देसाई यांनी सांगितले. उलट शिवसेनेकडून जैतापूर प्रकल्पाविषयी आक्षेप असणारे १७ अहवाल पंतप्रधानांना पाठवल्याची माहिती कदम यांनी दिली होती. याकडे मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले याकडे देसाईंनी लक्ष वेधले.

ग्रामसभांचा ठराव
जैतापूर ग्रामसभांनी गेल्या काही दिवसांत प्रकल्पाविरोधी ठराव मांडण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पस्थळाचे गाव असलेल्या माडबनसह, मिठगवाणे, निवेली, साखरीनाटे या गावांनी प्रकल्पाविरोधात ठराव मांडले असून ही संख्या आणखी वाढत जाणार असल्याचे माडबनचे सरपंच भिकाजी वाघधरे यांनी सांगितले. यावरून अाता रत्नागिरीसह काेकणात जैतापूर प्रकल्पाच्या विराेधात शिवसेना तीव्र वातावरण निर्मिती करण्याच्या तयारीत अाहे.

सिंचन प्रकल्पांवर सरकार ठेवणार उपग्रहाद्वारे नजर
सातारा | जलसिंचनाची कामे महत्त्वाची आहेत. सिंचनाचे जे प्रकल्प सुरू अाहेत किंवा सुरू हाेतील त्यांची चार पातळीवर तपासणी केली जाईल. ग्रामसभा, त्रयस्थ यंत्रणा अाणि शासकीय पथकाकडून तपासणीबराेबरच या कामांवर उपग्रहामार्फतही देखरेख ठेवली जाईल, त्यामुळे सिंचनातील भ्रष्टाचाराला चाप बसेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘व्यापाऱ्यांसाठी एलबीटी भरण्यासाठी अभय योजना आणली आहे, येत्या दोन महिन्यांत संबंधित अधिकारी यांना अभय योजनेतून पैसे भरून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. जे व्यापारी मुदतीत पैसे न भरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याचे फडणवीस म्हणाले.

प्रकल्पस्थळी आंदोलन
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी रविवारी जैतापूर प्रकल्पस्थळी आंदोलन केले. त्यांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापाशी जोरदार निदर्शने केली. प्रकल्पस्थळी घुसण्याचाही प्रयत्न केला. या वेळी सुरक्षा रक्षक व शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांची जादा कुमक मागवून आमदार व शिवसैनिकांना ताब्यात घेतले. जबरदस्तीने तो प्रकल्प रेटला जाणार असेल, तर आम्ही प्राणपणाला लावून त्याचा विरोध करू. काेकणवासियांचा जीव धाेक्यात घालणाऱ्या प्रकल्पाला तीव्र विराेध करू’, असे साळवी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...