मुंबई- ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’, या गाण्यातून आरजे मलिश्का मेन्डोसा हिने बृहन्मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढल्यानंतर आता BMC तिला अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे. तर मलिश्काने पाठिंब्याबद्दल मुंबईकरांचे आभार मानत माझ्याकडे आणखी 6 गाणी तयार आहेत, असे प्रत्त्यूत्तर दिले आहे.
तत्पूर्वी मलिश्काने डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने तिच्या आईला नोटीस बजावली. काँग्रेस, समाजवादी पक्ष, मनसे, संभाजी ब्रिगेड, आप या पक्षसंघटनांनी मलिश्काला पाठिंबा दिला आहे. लाखो मुंबईकरांनी टि्वट करत मलिश्काला पाठिंबा दिला. या पाठिंब्याने मलिश्काही भारावली, तिने मुंबईकरांचे आभार व्यक्त केले. यापूर्वी सेलिब्रिटी, ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या, मग त्यांच्या नोटिसा प्रसार माध्यमांकडे का गेल्या नाहीत, असा सवाल शिवसेनेला विचारला जातो आहे. शिवसेनेने मलिश्काला टार्गेट करण्यापेक्षा शहरातील रस्ते सुधारून पारदर्शी कारभार करावा, असा सल्ला शिवसेनेच्या नेतृत्वाखालील बृहन्मुंबई महापालिकेस सर्वपक्षीयांनी दिला आहे.