आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित वेमुला आत्‍महत्‍या: आंबेडकरी अनुयायांची मुंबईत जोरदार निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईतील आंबेडकरी अनुयायांनी गुरुवारी सायंकाळी उत्स्फूर्तपणे सीएसटीसमोर मूक निदर्शने केली. आझाद मैदानपानापासून सुरू झालेली रांग मेट्रो थिएटरपर्यंत गेली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या निषेधाचे फलक पथपथावर शांतपणे उभे राहून निषेध करणाऱ्या या युवकांनी हाती घेतले होते. १७ जानेवारी रोजी रोहित याने हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष, रिपाइं, भारिप आणि विद्यार्थी संघटनांनी या घटनेचा निषेध म्हणून निदर्शने केली. दोन दिवसापूर्वी मुंबईतील तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘रोहित वेमुला जस्टिस फोरम’ची स्थापना केली होती.
फोरमच्या आवाहनला प्रतिसाद देत सीएसटीला गुरुवारी हजारो युवक गोळा झाले होते. त्यामध्ये तरुणींची संख्या लक्षणीय होती. शेकडो तरुण-तरुणींच्या हाती पोस्टर्स होते. त्यावर ‘अभाविपवर बंदी घाला’, ‘रोहितला न्याय द्या’, ‘आम्ही पाचपेक्षा अधिक आहोत’, ‘रोहित तेरे बलिदान से बनेंगे, आंबेडकर हर मकान से’ अशा घोषणा लिहिलेले हिंदी, मराठी आणि इंग्रजीतील पोस्टर्स लक्ष वेधून घेत होते.
वाहतुकीची कोंडी
सकाळी अकरा वाजता काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी चेंबूरच्या पांजरापोळ चौकात निदर्शने केली. चौकात पाचशे कार्यकर्त्यांच्या जमावाने मंत्रालयाकडे येणारा पूर्व मुक्त मार्ग आणि सायन-पनवेल महामार्ग अर्धातासापेक्षा अधिक काळ अडवून धरला. त्यामुळे दोन्ही महामार्गवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.