आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या बागेतही चालतो ‘रोमान्स’...! : मात्र त्याकडे दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कुठल्याही निर्मितीसाठी, सृजनासाठी दोन जीव एकत्र यावे लागतात. निसर्गामधला प्रत्येक घटक त्यासाठी उत्सुक असतो. मनुष्याप्रमाणे वनस्पतीविश्वही हाच नियम सिद्ध करत असते. नवनिर्मितीसाठी सृष्टीतल्या ब-या च वनस्पती मध्यस्थावर अवलंबून असतात. हे मध्यस्थ पॉलिनेटर (निर्मितीक्षम जोडीदार) म्हणून ओळखले जातात. निसर्गात घडणारा सृजनाचा सोहळा आपल्या बागेत, गॅलरीतल्या कुंडीतही सुरू असतो, पण आपले त्याकडे दुर्लक्षच होते. हे सुंदर क्षण अनुभवण्याबरोबरच निर्मितीक्षम निसर्गाचे जतन, संवर्धन करण्याचा संदेशही नकळत बिंबवला जात असतो. हाच हेतू ठेवून प्रसिद्ध वनस्पतितज्ज्ञ आणि फुलब्राइट स्कॉलर डॉ. राजेंद्र शिंदे यांनी ‘रोमान्स इन युवर गार्डन’ या नावाने वैज्ञानिक वस्तुनिष्ठता (फॅक्टस) लोकप्रिय करण्याचा उपक्रम व्याख्यानाच्या माध्यमातून सुरू केला आहे. मुंबई, पुणे या शहरामध्ये सामाजिक संस्थांच्या मदतीने ते प्रेझेंटेशनही सादर करतात.

डॉ. शिंदे म्हणाले, नवनिर्मितीसाठी अनेक वनस्पती पॉलिनेटरवर अवलंबून असतात. मराठीमध्ये वनस्पतींमधील फलनासाठीची परागीकरणाची प्रक्रिया असे म्हणता येईल. काही वेळा वा-या च्या झोताने, पाण्याच्या प्रवाहाने परागीकरण घडते. फुलपाखरे, पक्षी, वटवाघळे आणि असंख्य प्रकारचे कीटक हे प्रमुख पॉलिनेटर असतात. पॉलिनेटरला आकर्षित करण्यासाठी वनस्पती अनेक युक्त्या योजतात. हलक्याफुलक्या शैलीत वैज्ञानिक गोष्टी सांगितल्याने त्या अधिक सहजतेने कळतात. मनुष्याप्रमाणेच सगोत्र परागीकरणाला वनस्पतीही नकार देतात.
वनस्पती वापरत असलेल्या युक्त्या
आकर्षक रंगांची भुरळ
सुगंधाच्या लाटा
मधाचे आमिष
प्रथिनयुक्त कंदसदृश अन्न
काही रसायनाचे स्राव
अंडी घालण्यासाठी आश्रय


वनस्पतीच्या देठाजवळचे रंग करतात आकर्षित
वनस्पती पॉलिनेटरला आकर्षित करण्यासाठी आपले पुंकेसर, स्त्रीकेसर प्रदर्शित करते आणि त्यांच्या देठाजवळचे रंग पॉलिनेशननंतर गडद करते. पॉलिनेटरसाठी ही चक्क मिशन सक्सेसफुलची सूचना असते. कॉमिलिनासारख्या काही वनस्पती पॉलिनेटरला आकर्षित करण्यासाठी प्रथिनयुक्त अन्नाचे आमिष दाखवतात आणि कार्यभाग साधतात. काही वनस्पती परागीकरणानंतर पॉलिनेटरला मारूनही टाकतात अणि ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा’ याचा प्रत्यक्ष अनुभव देतात. अळू ही वनस्पती परागीकरणासाठी आपल्या केसरांचे तापमान वाढवते.