मुंबई - दीड कोटी लोकसंख्येच्या मायानगरी मुंबईत लाखो लोकांना एकवेळचे अन्नही िमळत नाही. दुसरीकडे तितक्याच लोकांना पुरेल इतके अन्न अक्षरश: कचऱ्यात फेकले जाते. मुंबईतील डबेवाले आता यामधील दुवा बनले असून समारंभ अन् हाॅटेलात वाया जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोहाेचवण्यासाठी त्यांनी ‘रोटी बँक इंडिया’ अन्नसाखळी बांधली आहे. या उपक्रमातून दररोज सुमारे तीनशे लोकांंची भूक भागवली जात आहे.
मुंबईत चाकरमान्यांना घरचा डबा पोहाेचवण्याचे काम गेली १२५ वर्षे गांधी टोपी ट्रेडमार्क असलेले डबेवाले करतात. िवश्वासार्हता आणि अचूक वेळ यासाठी डबेवाले नावाजले गेले आहेत. या डबेवाल्यांची संघटना सामाजिक उपक्रमातही आघाडीवर असते. पाच वर्षापूर्वी त्यांनी गरीब शाळकरी िवद्यार्थ्यांसाठी ‘शेअर माय डबा’ उपक्रम चालू केला होता. आता त्यांनी वाया जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोहाेचवण्यासाठी ‘रोटी बँक इंडिया’ उपक्रम हाती घेतला आहे.
असा आहे उप्रकम : मुंबईत दररोज समारंभ, हाॅटेल्स, पार्ट्या झडत असतात. त्यामधून हजारो लोकांना पुरेल इतके अन्न वाया जात असते. हे उरलेले अन्न डबेवाले तेथे जाऊन जमा करतात. टाटा, केईम, जेजे, टिळक, नायर अशा मोठ्या रुग्णालयातील गरजूंना हे अन्न वाटप करतात.
डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे ३० लाख रुपयांचे अन्न गरजूंपर्यंत पोहचले असल्याचा दावा मुंबई डबेवाला असोसिएशनने केला आहे. २० पेक्षा कमी लोकांचे अन्न असेल तर सायकलवर आणले जाते. त्यापेक्षा अधिक लोकांचे अन्न असल्यास टॅक्सीचा वापर केला जातो.
तळेकर कुटुंबीयांचा पुढाकार
लक्ष्मण तळेकर डबेवाला संघटनेच्या संस्थापकांपैकी एक. त्यांचे पुत्र गंगाराम तळेकर ५० वर्षे या संघटनेचे पदाधिकारी होते. गंगाराम यांचे पुत्र सुभाष संघटनेचे प्रवक्ते आहेत. २९ डिसेंबर २०१५ ला गंगाराम यांचा पहिला स्मृतीदिन होता. त्यानिमित्त संघटनेने हा उपक्रम हाती घेतला आहे.