आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rpi Leader Ramdas Athavale Attack On Congress ncp

माझा ही ‘दाभोलकर’ करायचा आहे काय? आठवलेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या समाजात असलेली अंधश्रद्धा नष्ट करण्याचे काम आयुष्यभर केले. मात्र काहींना ती सनातनी पध्दत तशीच राहावी असे वाटत होते. जेनेकरून समाजाचे पूर्वीपासून होत आलेले शोषण यापुढेही करता यावे म्हणून त्यांची हत्या झाली. मीसुद्धा समाजातील घटकांची एका वेगळ्या पद्धतीने अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही माझी झेड सुरक्षा काढून घेतली. सरकारला माझा नरेंद्र दाभोलकर करायचा आहे काय, असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केला.
राज्य शासनाने रामदास आठवले यांची झेड सुरक्षा काढली. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी हा सवाल केला. आठवले म्हणाले, महायुतीच्या बाजूने आंबेडकरी जनतेची मते मिळावीत म्हणून मी काम करत आहे. त्यामुळे मला रोखण्यासाठी सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत आहे. मी शरद पवारांची काँग्रेस आघाडीची साथ सोडल्याने माझी झेड सुरक्षा काढली गेली. मात्र, मी सुद्धा दाभोलकरांसारखेच काम करीत आहे. दाभोलकरांनी सनातनींना वटणींवर आणण्याचे काम केले. मी दलितांना न्याय मागत तथाकथित उच्च व प्रगत लोकांविरू्दध लढत असून, दलित व मागास लोकांना न्याय मिळावा म्हणून झटत आहे. त्या आर्थाने दाभोलकरांचे व माझे काम सारखेच आहे. त्यामुळे काहींना दाभोलकर नको होते त्यामुळे त्यांची हत्या झाली. त्यांना सुरक्षा असती तर हत्या झाली नसती. आता सरकारने माझी सुरक्षा काढल्याने त्यांना माझाही दाभोलकर करायची इच्छा आहे काय असा प्रश्न पडला आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी माझ्याशी सूड पद्धतीने वागत आहे. कारण मी महायुतीत सामील झाल्याने त्यांचा माझ्यावर राग आहे. राज्यात आता महायुतीची सत्ता येणार असून, भाजप-सेना व आरपीआय आघाडीला विधानसभेत 288 पैकी किमान 160 जागा मिळतील, असा माझा अंदाज आहे.
राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत सामील होण्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच रोखत असल्याचा आरोप करून आठवले म्हणाले, आमची महायुती भक्कम आहे. राज्यात यंदा सत्ता परिवर्तन अटळ आहे. आमच्या महायुतीत जर मनसे आली तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा सपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच ही सत्ताधारी आघाडी राज यांना महायुतीत सामील होण्यापासून रोखत आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पापाचा घडा भरला असून, राज्यात आता शिवशक्ती व भीमशक्तीची सत्ता येणार आहे, असेही आठवले यांनी बोलचाना सांगितले.