आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवले गट उदयनराजेंवर नाराज; बदलत्या भूमिकेने युतीचे नेते हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पक्षाध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला न जुमानणारे पक्षाचे सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले बंडाच्या पवित्र्यात दिसताच रामदास आठवलेंनी त्यांना रिपाइंतर्फे निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत भोसलेंनी पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने आठवलेंनी मांडलेले आडाखे बारगळले. त्यामुळे आता महायुतीच्या जागा वाटपात रिपाइंला सातार्‍याऐवजी पुण्याची जागा मिळावी, यासाठी आठवले आग्रही आहेत.

महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या चार जागा मिळाव्यात, अशी वारंवार मागणी आठवले यांनी केली. मात्र, सातारा, लातूरसह अन्य एक अशा तीन जागा रिपाइंला मिळतील, असे संकेत भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनी दिले आहेत. स्वत: आठवले लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसून ते थेट पाठीमागच्या दाराने म्हणजेच राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दिवाळीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांनी तसे आश्वासन मिळवल्याचेही खुद्द आठवलेंनी पत्रकारांना सांगितले होते.

दुसरीकडे, रिपाइंसाठी आठवले तीन जागा मागत असले तरी या जागांवर निवडून येतील असे सक्षम उमेदवार मात्र रिपाइंकडे नाहीत, हे आठवलेही जाणून आहेतच. म्हणूनच यापूर्वी सातार्‍यातील पत्रकार परिषदेत आठवले यांनी उदयनराजेंना रिपाइंतर्फे लोकसभा लढवण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते. या विषयावर त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्याचीही चर्चा होती. भोसले आपल्या पक्षाकडून लढतील, अशी आशा असल्याने सातारा, लातूर व अन्य एक अशा तीन जागा रिपाइंला मिळणार असल्याचे आठवले सांगत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंनी अजित पवारांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमांना हजेरी लावल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, भोसले गळाला लागत नसल्याने आठवलेंनी आता सातार्‍याऐवजी पुणे मतदारसंघ रिपाइंला मिळावा, असा लकडा लावला आहे. त्यामुळे शिवसेना- भाजपचे नेते हैराण झाले आहेत.