आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Social Networking One Man Army News In Marathi

‘रिपाइं’ची सोशल मीडियात वन मॅन आर्मी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे मोठे पक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल नेटवर्किंग साइट्सचा उपयोग करत असताना रिपाइंसारखा छोटा पक्षही हे अस्त्र प्रभावीपणे वापरण्यात मागे नाही. सोशल नेटवर्किंग साइट्सवरील पक्षाच्या अस्तित्वामागे आहे एक तरुण चेहरा मयूर बोरकर. फॅक्सच्या जमान्यातून पक्षाला ट्विटरपर्यंत पोहोचवत रस्त्यावरची लढाई लढणार्‍या पक्षाच्या रांगड्या कार्यकर्त्यांना एक नवे दालन खुले करून देण्यात बोरकरांचा मोठा वाटा आहे.
महाराष्ट्रातल्या एकूण 48 मतदारसंघांपैकी अवघी एक जागा लढवत असलेल्या रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वेगळा प्रचार तो काय असणार? महायुतीच्या एकत्रित सभांमध्ये आपल्या अनोख्या भाषण शैलीने धमाल उडवून देणारे आठवले सोडले तर रिपाइंचा एकही नेता सध्याच्या निवडणुकीत चर्चेत नाही. मात्र तरीही या पक्षाचे अस्तित्व सोशल नेटवर्किंगवर मात्र चांगलेच जाणवते. मग ते ट्विटवर हँडल असो, फेसबुक पेज असो किंवा वॉट्सअप सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स असोत इथे सगळीकडे रिपाइंची चांगलीच चर्चा आहे. या सगळ्या साइट्सवर पक्षाला सतत चर्चेत ठेवण्यासाठी एखादी तगडी आयटी टीम कार्यरत असेल असा आपला अंदाज असेल तर ते चूक ठरेल. कारण या सगळ्या खटपटी करणारा फक्त एकच माणूस आहे, तो म्हणजे बोरकर.
अपील टू व्होटर्स
रामदास आठवलेंचे जनसंपर्क अधिकारी असलेले मयूर बोरकर हेच पक्षाच्या सोशल नेटवर्किंगची धुरा सांभाळतात. पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर आठवलेंचा दिनक्रम अपडेट करतानाच या पेजवर ‘अपील टू व्होटर्स’सारखी एखादी वेगळी संकल्पना राबवण्याचे वेगळेपण हाच बोरकरांचा यूएसपी आहे. आठवलेंचे ट्विटर हँडल हाताळतानाच दिवसभरातली एखादी महत्त्वाची घडामोड पक्षाच्या पाच अधिकृत वॉट्सअप ग्रुपमधून राज्यभरातल्या 2200 पत्रकारांपर्यंत ते लिलया पोहोचवतात. फक्त आपल्या पक्षापुरता विचार न करता महायुतीतल्या सगळ्याच पक्षांच्या घडामोडी, नेत्यांच्या पत्रकार परिषदा, भाषणांमधले महत्त्वाचे मुद्दे अगदी वेळेत या साइट्सच्या माध्यमातून प्रसारीत करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे.
राज्यातील जवळपास दहा हजार पदाधिकार्‍यांना एखादी महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी रिपाइंने एक एसएमएस ग्रुप बनवला आहे. या बल्क मेसेजेसच्या माध्यमातून पक्षाच्या बैठका, आंदोलने, मेळावे आणि सभांची माहिती क्षणार्धात पदाधिकार्‍यांपर्यंत पोहोचवण्यात येते. तसेच पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीच्या माध्यमातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या किंवा मतदारांच्या सूचना पक्षाच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचवल्या जातात.
कोण आहेत बोरकर?
गेली पंधरा वर्षे जाहिरात क्षेत्रात कार्यरत. विविध पक्षांना प्रचारसाहित्य पुरवणे, प्रदर्शने आयोजित करणे तसेच बॅनर आणि होर्डिंग्ज उभारण्याची कंत्राटे घेणे या व्यवसायात जम बसल्यानंतर रिपाइंच्या जनसंपर्काचे काम सुरू केले. जानेवारी 2011 पासून रामदास आठवलेंच्या संपर्कात. माध्यमांची चांगली जाण असल्याने अल्पावधीत चांगलाच जम बसवण्यात यशस्वी.
ऑनलाइन सदस्य
मतदारांना आवाहन करणार्‍या आठवलेंच्या 50 सेकंदांच्या छोट्या चित्रफिती बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच टीव्ही, वर्तमानपत्रे आणि रेडिओच्या माध्यमातून जाहिरातींचे नियोजनही शेवटच्या टप्प्यात आहे. पक्षाची अधिकृत वेबसाइटही बनवण्यात आली असून त्यावर पक्षाच्या इतिहासाबरोबरच सदस्यत्वाचा ऑनलाइन अर्जसुद्धा उपलब्ध आहे. महाविद्यालयीन पातळीवरच मतदारांची नोंदणी करण्यासाठी सध्या रिपाइंने निवडणूक आयोगाकडे आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
आरपीआयच्या सोशल नेटवर्किंग साइट्सविषयी
वेबसाइट -
ट्विटर -
व्हॉट्सअँपचे पाच ग्रुप
आठवलेंच्या भाषणाच्या चित्रफितीही
मुंबईतल्या तब्बल आठशे आणि राज्यभरातल्या एकूण बावीसशे पत्रकारांच्या नावांसह फोन नंबर्सची यादी.