आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागावाटपाचा त्वरित निर्णय घ्या अन्यथा महायुतीतून बाहेर पडू- आरपीआयचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप-शिवसेना या मित्रपक्षाकडून आम्हाला कोणताही सन्मान दिला जात नाहीये. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. लवकरात लवकर निर्णय घ्या, जिंकून येऊ शकतील अशाच व सन्मानपूर्वक जागा द्या अन्यथा महायुतीतून बाहेर पडू असा इशारा आरपीआयचे प्रवक्ते अर्जुन डांगळे यांनी दिला आहे. महायुतीच्या भूमिकेमुळे आम्ही नाराज असून, येत्या 10 सप्टेंबरला होणा-या पक्षाच्या कार्यकारिणीत अंतिम निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. महायुतीत येताना आमच्या पक्षाचा व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, युती आमचा कसलाही सन्मान राखत नसल्याचे डांगळेंनी म्हटले आहे.
रामदास आठवले यांच्या रिपाइं गटाने गेली चार वर्षे शिवसेना-भाजपबरोबर घरोबा केलेला आहे. लोकसभेला या पक्षाच्या वाट्यास एक जागा (सातारा) आली होती. विधानसभेला मात्र आठवले यांना किमान 13 जागा हव्या आहेत. पण, महायुतीचे नेते 6 पेक्षा अधिक देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आठवले सध्या नाराज आहेत. त्यांनी आपले गाऱ्हाणे दिल्ली दरबारी मांडले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेटही घेतली. मात्र रिपाइंची मागणी कोणी गांभिर्याने घेण्यास तयार नाही. त्यामुळे दबावतंत्राचा अवलंब आठवले यांनी करण्याचे ठरवले आहे.
त्याचाच भाग म्हणून आरपीआयने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच महायुतीला 10 सप्टेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेतला खासदार रामदास आठवले उपस्थित नव्हते. फक्त पक्षाचे प्रवक्ते अर्जुन डांगळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप-आरपीआय नेत्यांत दोन तास चर्चा- दरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे व आरपीआयचे नेते सुमंत गायकवाड आणि अविनाश महातेकर यांच्यात आज सुमारे दोन तास जागावाटपावर चर्चा झाली. भाजप लढवित असलेल्या 8 जागांची मागणी आरपीआयने केली आहे. यात चेंबूर, कुलाबा, पिंपरी, केज, उत्तर नागपूर, गंगाखेड, चाळीसगाव, बाळापूर आदी जागांचा समावेश आहे. या जागा देण्याबाबत भाजप सकारात्मक विचार करेल असे विनोद तावडेंनी म्हटले आहे. याचबरोबर स्वाभिमानी व रासप मागत असलेल्या बहुतेक जागा शिवसेना लढवित असल्याने या दोन पक्षांना जागा देताना शिवसेनेने हात सैल सोडावा असे भाजपला वाटत आहे.